

Tear down the old number plate and hand it over to the vehicle owners RTO
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवल्यानंतर जुनी नंबर प्लेट तोडूनच वाहनधारकांच्या हाती द्यावी अन्यथा संबंधित एनज्सीवर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिला.
२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात सुमारे विविध वर्गांतील ९ लाख ५० हजार वाहने आहेत. यापैकी, सुमारे २ लाख वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. या प्लेट बसवल्यानंतर वाहनधारक जुनी प्लेट तशीच घेऊन जात आहेत. नियमानुसार ही प्लेट तोडूनच वाहनधारकांच्या हाती देण्याचा नियम आहे, परंतु या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने जुन्या नंबर प्लेटचा गैरवापर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या अनुषंगाने नुकतीच एजन्सीधारकांची बैठक घेऊन वरील सूचना दिल्या आहेत.
एजन्सीधारक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवताना सॉकेट बसवण्यासाठी सक्ती करत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन यापुढे नंबरप्लेटसाठी सॉकेटची सक्ती केली तर एजन्सी रद्द करण्याच्या कारवाईचा इशारा दिला. शहरात सुमारे ५५ ठिकाणी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी केंद्र, उघडण्यात आले आहेत. यातून नियमित काम सुरू आहे.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर आरटीओकडून कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, शासनाकडून यात काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती काठोळे यांनी दिली.