Only 55 percent of the rainfall has been received in the district till date.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानाचे प्रमाण अद्याप कमी असून पावसाळा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत केवळ ५५ टक्केच पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यातील कन्नड तालुक्यात सर्वाधिक पाऊस १३२ टक्के झाला असून आतापर्यंत तर सर्वात कमी ७३ टक्के पाऊस गंगापूर तालुक्यात झाल्याची नोंद ऑगस्ट अखेरपर्यंत आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिने उलटत आले आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यंदा जिल्ह्यात १ जूनपासून ते ११ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत ५५ टक्केच पाऊस पडल्याचे नोंदवले गेले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याची हंगामी सरासरी पर्जन्यमान ५८१.७ मि.मी. आहे. मात्र प्रत्यक्षात ३२१.० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहर तालुक्यात सरा सरीपेक्षा अधिक किंवा बरोबरीचा पाऊस झाला आहे. यात कन्नड तालुक्यात आतापर्यंत १३२ टक्के (४४१ मिमी) पाऊस नोंदला गेला आहे.
तर फुलंब्रीत आतापर्यंत १२३ टक्के, वैजापूर येथे १०५, तर शहरात ९९.६ टक्के पाऊस झाला आहे. तसेच सोयगाव ८३ टक्के, गंगापूर ७३ आणि सिल्लोडमध्ये ९२ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच विभागीय पातळीवर छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत केवळ ६९ टक्के पावसाची नोंद असून, विभागाची एकूण सरासरी ६७९.५ मिमीच्या तुलनेत ३३२.३ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून, उर्वरित पर्जन्यमान पूर्ण होण्यासाठी ऑगस्टअखेरपर्यंत जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.