Ganeshotsav DJ Ban : नियम मोडल्यास खैर नाही; पोलिसांची डीजेचालकांना तंबी file photo
छत्रपती संभाजीनगर

Ganeshotsav DJ Ban : नियम मोडल्यास खैर नाही; पोलिसांची डीजेचालकांना तंबी

गणेशोत्सवात केवळ '२ टॉप अन् २ बेस'लाच मुभा; 'प्लाझ्मा' स्पीकरवर बंदी

पुढारी वृत्तसेवा

Only '2 tops and 2 bases' are allowed in Ganeshotsav; Ban on 'Plasma' speakers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कानठळ्या बसवणारा आवाज लावणाऱ्या डीजेचालक आणि मालकांना शहर पोलिस प्रशासनाने सक्त तंबी दिली आहे. ऐन सणासुदीत डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने काहीअंशी सूट दिली असली, तरी कोणत्याही परिस्थितीत '२ टॉप आणि २ बेस' पेक्षा अधिक सिस्टीम लावता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीला डीजे वापरावर बंदीचीच भूमिका घेतली होती. मात्र, या निर्णयामुळे डीजे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने, पोलिस आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त शशिकांत सातव आणि रत्नाकर नवले यांच्या उपस्थितीत डीजे असोसिएशनसोबत एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहरासह परिसरातील ११५ डीजे चालक-मालक उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांकडून डीजे चालकांना स्पष्टपणे बजावण्यात आले की, उपजीविकेचा प्रश्न म्हणून मर्यादित साऊंड सिस्टीमला परवानगी दिली जात आहे. मात्र, नवीन नियमांनुसार एका डीजे सेटअपमध्ये जास्तीत जास्त '२ टॉप' आणि '२ बेस'च वापरता येतील. तसेच, कानठळ्या बसवणारे आणि अतितीव्र आवाज निर्माण करणारे 'प्रेशर मिड साऊंड स्पीकर' आणि 'प्लाझ्मा स्पीकर' वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास आणि आवाजाची पातळी ओलांडल्यास डीजे सिस्टीम जप्त करून गुन्हे दाखल केले जातील, अशी सक्त तंबी या बैठकीत देण्यात आली.

'२ टॉप, २ बेस' अन् प्लाझ्मा बंदीचे कारण काय ?

जीवघेणी धडधड रोखणारः एरवी डीजे सेटअपमध्ये ४ ते ८ बेस वापरले जातात. यातून निर्माण होणाऱ्या अति-सखोल कंपनांमुळे छातीत धडधड वाढून हृदयाचा ठोका चुकण्याचा धोका असतो. आता केवळ '२ बेस'मुळे ही धडधड नियंत्रणात राहील. कानठळ्या बसणे टळणार : 'प्रेशर मिड' आणि 'प्लाइमा स्पीकर' हे ध्वनीला अतिशय तीक्ष्ण करून दूरवर फेकतात, ज्यामुळे कानाचे पडदे फाडणारा आवाज निर्माण होतो. यावर बंदी आल्याने कानांवर पडणारा ताण कमी होईल.

पोलिस ग्राऊंडवर प्रत्यक्ष डेसिबलची तपासणी

बैठकीत केवळ तोंडी समज न देता, सर्व डीजे चालक-मालकांना थेट पोलिस परेड ग्राऊंडवर नेण्यात आले. तिथे '२ टॉप, २ बेस' सिस्टीम लावून त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. नॉईज लेव्हल मीटरच्या सहाय्याने ध्वनीची तीव्रता तपासून, कायद्याने ठरवून दिलेली ६५ ते ७५ डेसिबलची आवाजाची मर्यादा ऑपरेटरला समजावून सांगण्यात आली आणि ही मर्यादा कोणत्याही परिस्थितीत न ओलांडण्याची तंबी दिली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT