Now license, badge mandatory for e-rickshaws
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ई-रिक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने ६ फेब्रुवारी रोजी ई-रिक्षा नोंदणी करताना वाहन मालक व चालकाची पोलिस चारित्र्य पडताळणी, वैध चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि अधिकृत बॅज अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमामुळे एकाच्या नावावर अधिक रिक्षा असणाऱ्यांची अडचण होणार आहे.
चांगलीच केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-रिक्षांना परवाना आवश्यक नसला तरी या सवलतीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तालयास प्राप्त झाल्या होत्या. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ई-रिक्षांची नोंदणी तसेच गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या नावावर ई-रिक्षा नोंद झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत इतर रिक्षाचालक संघटनांनीही ई-रिक्षांना देण्यात येत असलेल्या सुविधांचा विरोध केला होता. त्यामुळे आता ई-रिक्षांनाही बॅज, लायसन्स, मालक, चालकाचे चारित्र्य पडताळणी अनिवार्य केली आहे. यापुढे या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
अधिक ई- रिक्षा अडचणीच्या ठरणार ई-रिक्षांना लायसन्स, बॅज व चरित्र पडताळणी अनिवार्य नसल्याने अनेकांनी दोनपेक्षाही जास्त रिक्षा एकाच्याच नावावर घेतल्या आहेत. त्यांना नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे. आता या नवीन नियमामुळे यांची चांगलीच गोची झाली आहे.
रिक्षा नोंदणीसाठी कागदपत्रे आवश्क
परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून, आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या ई-रिक्षांची नोंदणी न करण्याचे आदेश दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. हे आदेश सह परिवहन आयुक्त संदेश चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.