Not enough water even during the monsoon season
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेची पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याची घोषणा पावसाळ्यातही कागदावरच असून, जुलै संपत आला तरी शहरवासीयांना उन्हाळ्याप्रमाणेच पिण्याच्या पाण्याच्या झळा सहन कराव्या लागत आहे. काही भागात १० व्या तर काही भागात तब्बल १२ ते १५ व्या दिवशी पाणीप-रवठा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शहरात मे, जून महिन्यात सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र जुलै उजाडताच पुन्हा जलवाहिनी फुटणे आणि वीज पुरवठा सतत खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात शहरवासीयांना उन्हाळ्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात गेल्या आठवड्यात जलवाहिनी फुटल्याने सलग दोन दिवस पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आले होते.
त्याअगोदर वीज पुरवठा खंडित झाल्याने एक दिवसाने पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आले होते. दोन आठवड्यांत तीनवेळा पाण्याचे टप्पे पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहराच्या विविध वसाहतींतून दररोज पाण्यासाठी ओरड होत आहे. त्यामुळे नागरिकांतू संताप व्यक्त होत असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
शहरासाठी नव्याने टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून सध्या २५ ते ३० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. मात्र फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात या जलवाहिनीसाठी नवा जलशुद्धीकरण केंद्र तयार केल्याने त्याला पाईप जोडण्याचे काम आठवडाभरात केले जाणार आहे. या कामासाठी किमान २ दिवसांचा शटडाऊन लागणार आहे. येत्या आठवड्यात जर या कामासाठी शटडाऊन घेतल्यास पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. परंतु यामुळे शहराला ९०० च्या जलवाहिनीतून पूर्णक्षमतेने ७५ एमएलडी पाणी मिळणार आहे.
एन-५ जलकुंभ (आर २)- दहा दिवसांआड
शहागंज जलकुंभ - बारा दिवसांआड
मरीमाता जलकुंभ-दहा दिवसांआड
जय विश्वभारती जलकुंभ-आठ दिवसांआड
जुबली पार्क जलकुंभ - नऊ दिवसांआड
गारखेडा जलकुंभ-आठ दिवसांआड