

A tractor caught transporting illegal sand driven away boy premises Tehsil office
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
अवेेध वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रॅक्टर मुलाने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवला. तहसीलदार अॅक्शन मोडवर येताच अवघ्या चोवीस तासांत वडिलांनी पुन्हा आणून लावले. हा सर्व नाट्यमय प्रकार सिल्लोड येथील तहसील कार्यालयात मंगळवारी व बुधवारी रात्री घडला.
महसूलच्या पथकाने शहरालगत विजू - बारकू दुधे (रा. खोडकाईवाडी) यांचा अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ८ जुलैला पकडून जप्त केला होता. हा विना पासिंग ट्रॅक्टर गेल्या पंधरादिवसांपासून तहसीलच्या आवारात उभा होता. मंगळवारी (दि. २२) रात्री ट्रॉली सोडून हा ट्रॅक्टर पळवला. बुधवारी (दि. २३) सकाळी सदर बाब लक्षात आली व तहसीलच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तर सदर बाब गंभीर असल्याने तहसीलदार सतीश सोनी यांनी बुधवारी तातडीने सिल्लोड मंडळाचे मंडळ अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
या सर्व घडामोडीत बुधवारी रात्री पुन्हा पळवलेला ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात आणून लावल्याचे गुरुवारी (दि. २४) सकाळी निदर्शनास आले व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर या संदर्भात मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. दरम्यान सदर ट्रॅक्टर मुलाने पळवला. तर कारवाईच्या बडग्यामुळे वडिलांनी आणून लावल्याचे कळते. पळवलेला ट्रॅक्टर आणून लावला असला तरी सदर बाब महसूल विभागासाठी गंभीर आहे, हे मात्र नक्की.