Nine hundred farmers end life in Marathwada in ten months
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीच्या संकटानंतर मराठवाड्यात शेतकरी जीवन संपवण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात विभागात तब्बल १०९ शेतकर्यांनी आपले जीवन संपविले आहे. तर १ जानेवारीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या दहा महिन्यांत मराठवाड्यात तब्बल ८९९ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक दोनशे जीवन संपवण्याच्या घटना बीड जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदाही अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाल्याचे विदारक चित्र आहे. जानेवारी ते ऑक्टोबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील ८९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
यात सर्वाधिक म्हणजे २०० आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७१ जणांनी, तर नांदेड जिल्ह्यात १४५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. धाराशिव जिल्ह्यात ११५, जालना ५८, परभणी ९०, हिंगोली ५३, लातूर जिल्ह्यात ६७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ५६० प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. २३७ प्रकरणे चौकशी वा निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. तर १०२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
विभागातील शेतकरी आत्महत्या
(महिना व आत्महत्या संख्या याप्रमाणे) जानेवारी : ८८, फेब्रुवारी : ७५, मार्च : ११०, एप्रिल : ८९, मे : ७७, जून : ८५, जुलै : १०७, ऑगस्ट ७६, सप्टेंबर : ८३, ऑक्टोबर : १०९. एकूण : ८९९