

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विवाहित २१ वर्षीय मुलगी शनिवारी (दि.८) घरातून काहीच न सांगता निघून गेल्याच्या तणावातून तिच्या ५० वर्षीय आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सातच्या सुमारास उस्मानपुरा भागात उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी तिला शोधण्यास दिरंगाई केल्याने आणि तिला घेऊन जाणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाइकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणून ठेवला. त्यामुळे रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर दोन तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून ८ जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईक माघारी फिरले.
अधिक माहितीनुसार, मृत महिलेची २१ वर्षीय मुलगी ८ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात मिसिंग दाखल केली होती. पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी या प्रकरणाचा तपास अंमलदार खिल्लारे यांच्याकडे दिला. त्या मुलीने बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन परत आई-वडील आणि पतीकडे जायचे नाही, असे लिहून दिले. ही माहिती उस्मानपुरा पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना दिली. मात्र कुटुंबीयांनी तिने आमच्यासमोर हे सांगावे, अशी मागणी करत पोलिसांना सोबत बुलढाणा येथे येण्यास विनवणी केली.
मात्र उस्मानपुरा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, गुरुवारी दुपारीही मुलीचा भाऊ, कुटुंबीय उस्मानपुरा ठाण्यात गेले होते. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र दोघेही सज्ञान असल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले, त्यामुळे कुटुंबीय माधारी आले. मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर आईने सायंकाळी सातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री संतप्त नातेवाईक आणि नागरिक मृतदेह घेऊन उस्मानपुरा ठाण्यात गेले. आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, संभाजी पवार, अविनाश आघाव, सचिन कुंभार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके, दंगा काबू पथक असा मोठा फौजफाटा उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दाखल झाला. दोन तास ठाण्यासमोर जमाव ठाण मांडून होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
तरुणासह कुटुंबातील ८ जणांविरुद्ध गुन्हा
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुलीला घेऊन जाणारे वैभव बोर्डे, पार्वती बोर्डे, विशाल बोर्डे (रा. रमानगर), मनीषा पवार, नंदू पवार, राजेंद्र पवार (तिघेही रा. शास्त्रीनगर, बुलढाणा) गौरव बोर्डे, केसरबाई दगडू बोर्डे (रा. बदनापूर) यांच्याविरुद्ध मृत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.