200 MLD water test to be conducted in November
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांची भव्य नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी पाण्याची चाचणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे व जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगुलोथ यांनी दिली. यासाठी अतिरिक्त आठ जलकुंभ मनपाच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू असून, मुख्य जलवाहिनीसह बटरफ्लाय व्हॉल्व्हचीही तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरासाठीची नवीन पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविली जात असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जीव्हीपीआर कंपनीकडून हे काम केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. शहराला वाढीव पाणीपुरवठा देण्यासाठी जॅकवेलवरील काम जलद गतीने सुरू असून, वर्षाअखेर २०० एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जॅकवेलवर ३७०० अश्वशक्ती क्षमतेचे दोन पंप बसविण्यात आले असून, त्यावर स्लॅब टाकून मोटारी बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन होते; मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि डीएमआयसी योजनेची जलवाहिनी फुटल्याने कामगारांच्या वास्तव्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे काही दिवस जॅकवेल वरील काम थांबवावे लागले असून, आता पुन्हा त्याला गती देण्यात येणार आहे.
सध्या शहरासाठी चार जलकुंभ कार्यान्वित असून, आणखी आठ जलकुंभांचे काम पूर्णत्वाला आले आहे. २०० एमएलडी पाणी आल्यानंतर साठवण करण्याची अडचण टाळण्यासाठी हे जलकुंभ मनपाच्या ताब्यात देण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार असून, शहरवासीयांना अधिक नियमित व सुरळीत पाणी मिळण्यास मदत होईल.
चाचणीदरम्यान २५०० दललि. क्षमतेच्या मुख्य जलवाहिनी, बटरफ्लाय व्हॉल्व्ह तसेच शहरातील अंतर्गत जलवाहिनींची तपासणी करण्यात येईल. पाणी जलकुंभात आल्यानंतर वितरण व्यवस्थेतूनही चाचणी घेण्यात येणार आहे.