

Bad weather: The plane hovered over the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खराब हवामानामुळे शुक्रवारी (दि.१९) सकाळी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे इंडिगोचे विमान शहरावर घिरट्या मारून नागपूरला गेले. सुमारे दोन ते अडीच तासांनंतर नागपूरहून हे विमान पुन्हा शहरात दाखल झाल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली.
इंडिगोचे सकाळच्या वेळेतील मुंबई - छत्रपती संभाजीनगर विमान रोज सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास शहरात दाखल होते आणि ७:१५ वाजता पुन्हा मुंबईसाठी उड्डाण घेते. हे विमान शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विमानतळावर आले.
मात्र धुक्यामुळे त्याला येथील विमानतळावर उतरणे शक्य झाले नाही. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा मिनिटे विमानाने शहराला घिरट्या मारल्या. मात्र त्यानंतरही विमान उतरण्यासारखे वातावरण नव्हते. त्यामुळे पायलटने विमान नागपूरला वळवण्याचा निर्णय घेतला.
चिकलठाणा विमानतळावर न उतरता नागपूरला गेलेले इंडिगोचे सकाळचे विमान सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पुन्हा चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले. यामुळे मुंबईहून शहरात येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धुक्यामुळे हे विमान नागपूरला वळवण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.