Crime News : न्यू विश्वास ज्वेलर्स चोरी प्रकरण : सोलापूरच्या टोळीचा पर्दाफाश File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : न्यू विश्वास ज्वेलर्स चोरी प्रकरण : सोलापूरच्या टोळीचा पर्दाफाश

चार महिलांसह ९ जणांच्या टोळीची ओळख निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

New Vishwas Jewellers Theft Case: Solapur Gang Busted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिटी चौकातील 'न्यू विश्वास ज्वेलर्स' मधून भरदिवसा २ किलो सोन्याचे दागिने हातोहात पळवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केला आहे. या धाडसी चोरीमागे सोलापूरची आंतरराज्य टोळी असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक चंदेश गायकवाड (रा. सलगर वस्ती, सोलापूर) असे या अटक केलेल्या चालकाचे नाव असून, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या तपासात या टोळीचा पळून जाण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. आरोपी दीपक गायकवाड याच्याच इनोव्हा गाडीतून ही टोळी २० ऑगस्ट रोजी सोलापूरहून शहरात आली होती. गर्दीच्या ठिकाणी गाडी नेण्याऐवजी त्यांनी आपली गाडी अमरप्रीत चौकात उभी केली आणि तेथून रिक्षा करून सिटी चौकातील सराफा बाजार गाठला.

ज्वेलर्समध्ये बुरखा घालून गेलेल्या महिलांनी २ किलो सोन्याचा डबा लांबवल्यानंतर, त्यांनी पुन्हा रिक्षानेच अमरप्रीत चौक गाठला आणि तिथे आधीच तयार असलेल्या - इनोव्हा कारमध्ये बसून थेट सोलापूरकडे धूम ठोकली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपायुक्त शशिकांत सातव यांना सूचना देऊन गुन्हे शाखेची दोन पथके नेमली होती.

पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज खंगाळून अखेर इनोव्हाचा माग काढला आणि चालक सापडल्याने टोळी निष्पन्न झाली. सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांचेही पथक आरोपींच्या मागावर आहे.

चार महिला, ५ पुरुषांची सराईत टोळी

या धाडसी चोरीमागे सोलापूरच्या ९ जणांच्या टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये दुकानात शिरलेल्या ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी पिंपरी-चिंचवडसह परराज्यातील झहीराबाद (तेलंगणा) आणि कर्नाटकमध्येही गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने या सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली असून, त्यांच्या शोधासाठी पथके कसून तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT