Chhatrapati Sambhajinagar crime
छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रॅक्टर शेतातून जाऊ न दिल्याच्या जुन्या वादाचा राग मनात धरून, २६ वर्षीय चुलत भावाने आपल्याच काका-काकूंचे अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये तयार केले आणि ते इतरांना प्रसारित केले.
याप्रकरणी पीडिताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात आरोपी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीची गावातून धिंड काढल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शेतातून वाट देण्यावरून कुटुंबात वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी २० वर्षीय संशयीत आरोपी पुतण्याने अत्यंत खालची पातळी गाठत काका-काकूंचे प्रायव्हेट व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडिया व इतरांच्या मोबाईलवर प्रसारित करण्यात आले.
एवढ्यावरच न थांबता, आरोपीने आणखी काही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच काकू व चुलत भावाला शिवीगाळ करत मारहाणही केली. या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुलताबाद पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.