Navratri Festival: Prices of sweet potatoes, raw bananas, and water chestnuts have risen!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली असून, नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात बहुतांश नागरिक उपवास करतात. त्यामुळे सध्या शहरातील बाजारपेठांमध्ये नेहमीच्या भाजीपाल्याऐवजी उपवासाला चालणारी कंदमुळे, फळे आणि फराळाच्या साहित्याच्या खरेदीला मोठा जोर आला आहे.
रताळी, कच्ची केळी, भुईमूग शेंगा आणि शिंगाड्याला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. दुसरीकडे, नवरात्रात कांदा-लसूण आणि नेहमीच्या भाज्यांची मागणी कमी असली तरी, आवक घटल्याने त्यांचे दरही चढेच आहेत. त्यामुळे उपवासाचा फराळ आणि रोजचा स्वयंपाक अशा दोन्ही आघाड्यांवर बजेट वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
शहरातील औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी या प्रमुख बाजारपेठा उपवासाच्या पदार्थांनी आणि फळांनी सजल्या आहेत. नवरात्रात पालेभाज्या आणि फळभाज्या वर्ज्य असल्याने ग्राहकांचा कल उपवासाच्या भाज्या (कंदमुळे) आणि फळांकडे वळला आहे.
बाजारात उपवासाच्या पदार्थांची आवक पुरेशी असली तरी, वाढलेल्या अफाट मागणीमुळे या पदार्थांचे दर तेजीत असल्याचे औरंगपुरा येथील विक्रेत्यांनी सांगितले. साबुदाणा, भगर, राजगिरा यांसोबतच फळांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
नेहमीच्या भाज्यांचे दरही कडाडले
नवरात्रोत्सवात अनेक कुटुंबांमध्ये कांदा-लसूण आणि काही भाज्या खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे मागणीत घट होते. मात्र, सध्या बाजारात भाज्यांची आवकच कमी असल्याने त्यांचे दरही वाढलेलेच आहेत. टोमॅटो : ३० ते ४० रुपयांवरून ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. वांगी : ४० रुपयांवरून ६० रुपये किलो.
गाजर व कारले : प्रत्येकी ६० रुपयांवरून ८० रुपये किलो. मिरची (हिरवी व सिमला) ६० रुपयांवरून ८० रुपये किलो. श्रावण घेवडा, वाल, गिलके, दोडके प्रत्येकी ८० रुपये किलो. कंटुले : २०० ते २४० रुपये किलो. शेवगा : १०० रुपये किलो.
आले-लसूण-लिंबाने काढले डोळ्यात पाणी
भाजीपाल्यासोबतच स्वयंपाकात नियमित लागणाऱ्या लिंबू, आले आणि लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारात लिंबाचे दर १५० ते २४० रुपये किलो, आल्याचे १५० ते २४० रुपये किलो, तर लसणाचे दर थेट २५० ते ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.