छत्रपती संभाजीनगर

Crime News : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त ३७ लाखांचे अंमली पदार्थ जाळून केले नष्ट

नशाबंदीसाठी आक्रमक पावले उचलत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी १९ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत जप्त केलेले तब्बल ३७लाख ९४ हजार ४९१ रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रकियेनंतर नष्ट केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Narcotics worth 37 lakh seized in various crimes were burnt and destroyed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नशाबंदीसाठी आक्रमक पावले उचलत छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी १९ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत जप्त केलेले तब्बल ३७लाख ९४ हजार ४९१ रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रकियेनंतर नष्ट केले आहेत. या कारवाईत १७९ किलो २०९ ग्रॅम वजनाचा गांजा, एमडी पावडर आणि डायझापाम पावडरची रीतसर विल्हेवाट लावण्यात आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशान्वये ही मोहीम राबविण्यात आली.

नशामुक्त शहर करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडक पावले उचलली आहेत. आतापर्यंत अनेक ड्रग्समाफियांच्या टोळ्या गजाआड करून मोक्का लावल्याने मोहिमेला मोठे यश येत आहे. शहरातील वेदांतनगर, एमआयडीसी सिडको, सातारा, वाळूज, दौलताबाद, सिटी चौक आणि एमआयडीसी वाळूज या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यांतर्गत या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आली होती.

हा सर्व जप्त मुद्देमाल एमआयडीसी सिडको ठाण्यातील केंद्रीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला होता. या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाकडून इन्व्हेंटरी पंचनामा आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाचे रीतसर आदेश मिळवून, कायद्यात दिलेल्या तरतुदींनुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या मान्यताप्राप्त कंपनीत नेण्यात आले आणि तिथे कायदेशीररीत्या ते नष्ट करण्यात आले.

ही मोहीम पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त (परिमंडळ-१) पंकज अतुलकर, उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, नियंत्रण कक्षाचे मुकुंद पालवे, एमआयडीसी सिडकोचे गणपत राहीरे, एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांच्यासह अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT