

Beware of Fake Recruitment Advertisements on Social Media : Health Department
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर वर्ग-३ च्या, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि वर्ग-४ च्या, स्वच्छता कर्मचारी पदांच्या भरतीबाबत खोट्या जाहिराती व दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नागरिक व नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सध्या या पदांसाठी कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अप्रमाणित पोस्ट, संदेश किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोकरीचे आमिष दाखवून पैसे, वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणतेही शुल्क भरू नये, असेही सांगण्यात आले आहे. अप्रमाणित माहितीची खातरजमा न करता ती इतरांना फॉरवर्ड किंवा शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
भविष्यात या किंवा इतर कोणत्याही पदांची भरती जाहीर झाल्यास त्याबाबतची अधिकृत माहिती केवळ जि.प. छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच शासनमान्य प्रसिद्धी माध्यमांद्वारेच प्रसिद्ध केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ही सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आली आहे.