Nagad road passing through Gautala sanctuary destroyed
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील औट्रम घाटातून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्ग म्हणून गौताळा अभयारण्यातून नागदकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. याचा थेट फटका नागद, सायगव्हाण, चाळीसगाव परिसरातील नागरिकांना बसत असून, या मार्गावरील रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
या मार्गावर मोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबर उखडल्या गेले आहे. परिणामी वस, दुचाकी, चारचाकी तसेच रुग्णवाहिका व शालेय वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावर संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागद वन्यजीव वनपरीक्षेत्रातील तपासणी नाक्यावर कर्मचारी गैरहजर राहात असल्याने आओ-जावो घर तुम्हारा, अशी स्थितीअसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ता उखडल्याने लहान वाहनधारकांची प्रचंड गैरसोय, होत आहे.
रुग्णवाहिका, शालेय बस, दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. कन्नड नागद-सायगव्हाण-चाळीसगाव मार्गाची तातडीने डागडुजी व मजबुतीकरण करावे.
वन तपासणी नाक्यावर कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी होत आहे. कन्नड-नागदसाठी दळणवळणाच्या दृष्टीने गौतळा अभयआरण्यातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.
मात्र आता या रस्त्याची अवस्था अत्यंत दननीय झाली आहे. फक्त डागडुजी करून शासनाचा निधी हडप केला जातो. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागद-कन्नड ही बस चाळीसगाव तालुक्यातून जाते. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे.नामदेव गोटवाल, उपसरपंच नागद