Municipal Councils-Municipal Panchayats Election  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal council Election : नगरपरिषद, नगरपंचायतीची आजपासून रणधुमाळी

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा, एक नगरपंचायत तसेच जालना जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार (दि. १०) पासून सुरू होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Municipal council, municipal panchayat election to fight from today

छत्रपती संभाजीनगर /जालना पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा, एक नगरपंचायत तसेच जालना जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार (दि. १०) पासून सुरू होणार आहे. या नगरपालिका, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १० ते १७नोव्हेंबर या कालावधीत दुपारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंट स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्जासमवेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाचे टोकन जोडावे लागणार आहे.

राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्याबरोबरच संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीची मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सोयगाव वगळता उर्वरित फुलंब्री (नगरपंचायत), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर या नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर या तीन नगरपरिषदासाठी ही निवडणुका होत आहे.

या निवडणुकीसाठी उद्या सोमवारपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांसह स्थानिक गटांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेच चित्र असले तरी काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकमेकांशी युती होण्याचीही शक्यता आहे. सोमवार, दि. १० पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार असून रविवार वगळता १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दाखल अर्जाची दि. १८ रोजी सकाळी ११ पासून छाननी होणार आहे. यानंतर २१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्जाबाबत अपील दाखल झाले असल्यास असे अर्ज २५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. यानंतर २६ रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार असून त्याचवेळी प्रत्येक परिषद आणि पंचायतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रचाराला कमी वेळ

उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी उमेदवाराला नऊ दिवस मिळणार आहेत. त्यानुसार उमेदवारांसह पक्षांनीही प्रचाराची रणनीती निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध फंडे अवलंबले जाणार असून त्याचीही तयारी आतापासूनच केली जात आहे. याकरिता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानासह या क्षेत्रातील जाणकार सल्लागारांचीही मदत घेतली जात आहे. राजकीय पक्षांनी राज्यातील नेत्यांसह जिल्हास्तरावरील नेत्यांच्या सभांसाठी आखणी सुरू केली आहे. राजकीय पक्षाबरोबरच स्थानिक गटातटांनीही प्रचाराची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या गाठीभेटींना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT