Municipal Corporation’s initiative to sustain plants along drains using STP-treated water
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाल्यांवरील व्हर्टिकल गार्डनमधील रोपे पाण्याअभावी कोमेजत असताना ती वाचवण्यासाठी महापालिकेने आता प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा आधार घेण्याचे ठरवले आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) शुद्ध केलेले पाणी या रोपांना देण्याचा प्रयत्न उद्यान विभागाकडून सुरू आहे. या माध्यमातून नाल्यांवरील हिरवाई टिकवण्यासोबतच यापूर्वी केलेली लागवड वाचवण्याचे आव्हान मनपापुढे आहे.
महापालिकेकडून शहरातील खाम नदी आणि नाल्यांवरील पुलांवर भंगार साहित्याचा वापर करून लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, या उद्देशाने या जाळ्यांवर रोपांची लागवड करण्यात आली. सुरुवातीला या व्हर्टिकल गार्डनची चांगली निगा राखण्यात आली. रोपांना पाणी देण्यासाठी जवळच पाण्याच्या टाक्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा आणि देखभालीअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकू लागली आहेत. यातील बारापुला गेट परिसरातील दोन्ही बाजूंच्या जाळ्यांवरील रोपे कोमेजला आहेत. तसेच शहरातील इतर नाल्यांवरील उद्यानांचीही अशीच अवस्था झाली आहे. कमी पावसामुळे रोपांची वाढ खुंटल्याचे उद्यान विभागाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, सिद्धार्थ उद्यानाजवळील नाल्यावरील पुलावर सुकलेली रोपे काढून जाळीची दुरुस्ती करण्यात आली असून, नव्याने लागवड केल्याने पुन्हा हिरवाई दिसू लागली आहे. एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले पाणी शहरातील उद्याने आणि रस्त्यांवरील दुभाजकांमधील झाडांसाठी वापरले जाते. आता याच पाण्याचा वापर नाल्यांवरील व्हर्टिकल गार्डनसाठी करण्याचे नियोजन आहे. रोपांना नियमित पाणी देणे शक्य होईल, असा उद्यान विभागाचा प्रयत्न आहे. सुकलेल्या रोपांच्या जागी नव्याने लागवड करण्याची तयारीही विभागाने केली आहे.
एसटीपीच्या पाण्याचा पर्याय
शहरातील एसटीपी केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्याने आणि दुभाजकांवरील झाडांसाठी वापरले जाते. आता हेच पाणी नाल्यांवरील व्हर्टिकल गार्डनसाठी वळवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. नियमित पाणी मिळाल्यास सुकणारी रोपे वाचवण्यास मदत होऊ शकते.