Sambhajinagar News : मनपाचा कचऱ्यातून गॅस निर्मितीकडे कल File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपाचा कचऱ्यातून गॅस निर्मितीकडे कल

अर्थसंकल्पात शहरासाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation Leans Towards Gas Generation from Waste

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महानगरपालिकेने वाढत्या जागतिक ऊर्जा अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार सुरू केला आहे. कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा मानस २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला असून, यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

शहरातील ओला कचरा प्रक्रिया करून त्यातून गॅस निर्मिती करण्याची योजना महापालिकेच्या विचार-अधीन आहे. घराघरांतून संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या स्रोतावरच वर्गीकरण करून त्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करण्याचा उद्देश आहे. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पर्यायी इंधनाचा स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून शहरातील घराघरांतून कचरा संकलन करून त्याचे विलगीकरण करीत गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. मनपाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात हा प्रकल्प उभारण्याकडे कल असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. हा उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार असून, भविष्यातील ऊर्जा गरजांचा विचार करून धोरणात्मक पाऊल उचलण्याची दिशा प्रशासनाने दर्शविली आहे.

यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुढील महिन्यापासून नवीन एजन्सीमार्फत कामकाज हाती घेतले जाणार आहे. या अंतर्गत घराघरांतून कचरा संकलन, स्रोतावरच ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि बंदिस्त वाहनांद्वारे तो ट्रान्स्फर स्टेशन किंवा प्रोसेसिंग साईटपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

पुनर्प्रक्रियेला चालना

सुका कचरा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) मार्फत वर्गीकृत करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे प्लास्टिक, कागद, धातू यासारख्या वस्तूंचा पुनर्वापर वाढेल आणि पर्यावरणीय ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

जनजागृतीवर विशेष भर

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद (आयईसी) तसेच जनसंपर्क उपक्रम राबविले जाणार आहेत. कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता निर्माण करून नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

दूरदृष्टीचा निर्णय

सध्या हा प्रकल्प तातडीने राबविण्याचा निर्णय नसला तरी भविष्यातील ऊर्जा गरजा लक्षात घेऊन घेतलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा संकटाची शक्यता वाढत असताना स्थानिक पातळीवर स्वयंपूर्णतकडे वाटचाल करण्याचा हा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT