Municipal corporation employees to have a delightful Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका कर्मचाऱ्यांसह दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिवाळीची गोड बातमी आहे. वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना यंदा पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान, तर बालवाडी शिक्षिका आणि अन्य पात्र कर्मचाऱ्यांना तीन हजार ५०० रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय बुधवारी (दि. ४) महापौर समीर राजूरकर यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केला. याशिवाय दिव्यांग बांधवांना चार महिन्यांचा भत्ता अदा करण्यात येणार आहे. या सर्व योजनांसाठी महापालिकेकडून तब्बल सहा कोटी ३० लाख ७२ हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी वर्ग चार कर्मचाऱ्यांना तीन हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जात होते. यंदा त्यात वाढ करून सरसकट पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दैनिक वेतनावरील वर्ग तीन व चार कर्मचारी, शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका, तासिका तत्त्वावरील माध्यमिक शिक्षक, आरोग्य विभागातील लिंक वर्कर सुपरवायझर आणि बचत गटांतील सफाई मजुरांना प्रत्येकी तीन हजार ५०० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.
यापूर्वी ही रक्कम दोन हजार रुपये होती. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार ५०० रुपये सण अग्रिम दिले जाणार आहेत. महापालिका व शिक्षण विभागातील ९९८ कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी २४ लाख ७५ हजार रुपये खर्च होतील. वर्ग चारमधील दोन हजार ४५२ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी एक कोटी २२ लाख ६० हजार रुपये मिळतील.
दिवाळी भेटीसाठी महापालिकेतील ११, शिक्षण विभागातील १०६, आरोग्य विभागातील चार लिंक वर्कर आणि बचत गटांतील ३५२ सफाई मजूर अशा एकूण ४७३ लाभार्थ्यांना १६ लाख ५५ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी निधी वितरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी संजय कोलते नियोजन करीत आहेत.
दिव्यांगांना ३ कोटी ६६ लाखांचा भत्ता
दिव्यांग विकास योजनेंतर्गत महापालिकेच्या ४ हजार ५८९ लाभार्थ्यांना चार महिन्यांचा भत्ता दिला जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट, सण अग्रिम आणि दिव्यांग भत्ता मिळून सहा कोटी ३० लाख ७२ हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे.