Municipal Commissioner orders to file cases against those using banned plastic
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणे आता महागात पडणार आहे. शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी दुकाने, ट्रान्सपोर्ट व इतर ठिकाणांवर मनाई असलेले प्लास्टिक वापर करणाऱ्यांसह साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश बुधवारी (दि.१७) मनपा आयुक्तांनी दिले. नागरी मित्र पथकाने प्लास्टिकची वाहतूक करणाऱ्याकडून २५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, राज्य सरकारनेही प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने पथके स्थापन करून प्लास्टिकवर कारवाई केली जात आहे. मात्र त्यानंतरही अनेकांकडून कॅरीबॅगचा वापर सुरू आहे. त्यामुळे शहराला प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत शहरातील दुकाने, ट्रान्सपोर्ट व इतर ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांसह साठेबाजांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी बाबा पेट्रोल पंपासमोरून पीकअप या चारचाकी (एमएच २० जी सी ५३२२) या वाहनातून १८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक महापालिकेच्या झोन-२ कार्यालयाच्या नागरी मित्र पथकाने वाहनासह जप्त केले होते. या मालाची बुधवारी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, यांच्यासह उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी पाहणी करून संबंधित व्यापाऱ्यांसह वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधितांना २५ हजारांचा दंड आकारण्यात आला असून, त्यांच्याविरुध्द क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. यावेळी नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शहरात बहुतांशी मोठ्या व्यापाऱ्यांसह किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत, फळ भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा वापर करतात. आता मनपा आयुक्तांनी प्लास्टिक वापरा विरोधात कारवाईचा बडगा उगारत जोरदार मोहिम सुरू केली आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांसह साठेबाजांवर कारवाई करू गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. शहराच्या दृष्टीने ही मोहीम स्वागतार्हच आहे. परंतु व्यापारी खरेच प्लास्टिकचा वापर करणे थांबवतील का आणि शहर प्लास्टिकमुक्त होईल का, हे येणारा काळच सांगेल.