Sambhajinagar News : मनपा आयुक्तांकडून पीएमएवाय, शाळांच्या कामांची पाहणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपा आयुक्तांकडून पीएमएवाय, शाळांच्या कामांची पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश : कचरा प्रकल्पांसह वसतिगृहांच्या कामांचाही घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

Municipal Commissioner inspects PMAY and school projects

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कागदावरील प्रगतीपेक्षा प्रत्यक्ष कामाला वेग देण्यावर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी भर दिला आहे. रखडलेल्या तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची बुधवारी (दि.९) प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून दिली. यात पडेगाव व तीसगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना, मिटमिटा व बनेवाडीतील शाळा, कांचनवाडीतील कचरा प्रकल्प आणि चिकलठाणा येथील बांधकाम व पाडकाम आणि कचरा प्रकल्पासह कामगार महिला वसतिगृहांच्या प्रगतीची त्यांनी तपासणी केली.

महापालिकेकडून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विकासकामांसह प्रधानमंत्री योजना आणि शाळेच्या कामांची आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी पडेगाव येथील पीएमएवाय प्रकल्पात ३० सप्टेंबरपर्यंत दोन स्लॅबचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. संपूर्ण प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले. तीसगाव प्रकल्पातील दोन स्लॅब सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यास सांगण्यात आले.

तसेच लाभार्थ्यांची संख्या, पहिला हप्ता जमा केलेल्या लाभार्थ्यांची स्थिती आणि प्रत्यक्ष बांधकामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मिटमिटा येथील नवीन शाळेच्या पाहणीदरम्यान सौरऊर्जेचा पर्याय तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासह डी-मार्टच्या माध्यमातून कला वर्ग आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

दरम्यान, शाळेचे काम पूर्ण झाल्यास १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेशी सुसंगत बससेवा सुरू करणे आणि स्थलांतरानंतर आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले. याशिवाय बनेवाडी शाळेसाठी सहा वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले. जी-प्लस-वन इमारतीचे अंदाजपत्रक पुढील आठवड्यात सादर करून १५ दिवसांत प्लिंथचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. तर विटखेडा येथील प्रस्तावित शाळेसाठी नव्या विकास आराखड्यानुसार जागेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

१०० महिलांसाठी निवास

चिकलठाणा येथील पाच मजली कामगार महिला वसतिगृहात सुमारे १०० महिलांची निवासव्यवस्था केली जाणार आहे. सध्या पहिल्या स्लॅबचे काम सुरू असून जानेवारीपर्यंत इमारत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT