Municipal administration decided to provide houses for 1 lakh to those affected by encroachment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील पाच प्रमुख रस्त्याच्या रुंदीकरण-आड येणाऱ्या मालमत्तांवर महापालिकेने पाडापाडीची कारवाई केली. मात्र, या मोहिमेत ज्यांची घरे बाधित झाली. त्यांना महापालिका १ लाख रुपयांमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडासाठी आता प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रयत्न सुरू केले आहे.
महापालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास, जूना मुंबई रोड आणि जळगाव रोड हे पाच प्रमुख रस्ते विकास आराखड्यानुसार रुंद करण्यासाठी मोहीम राबविली. यात रुंदीकरणाआड येणारी सुमारे ४ हजार मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या.
या मोहिमेत चिकलठाणा गावठाण, पडेगाव गावठाण, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मुकुंदवाडी, संजयनगर, आंबेडकरनगर, मिटमिटा या भागात बहुतांश प्रमाणात परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या घरांचा समावेश आहे. त्यासोबतच मध्यमवर्गीयांची देखील घरे, दुमजली इमारतींचा काही भाग यात बाधित झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
या कारवाईनंतर आता महापालिकेने ज्यांची घरे बाधित झाली. त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, महापालिका जो प्रकल्प उभा करीत आहे. त्यातील एका सदनिकाची किंमत ही ९ ते ११ लाख रुपये आहेत. मात्र, महापालिका बाधितांना हे घर १ लाख रुपयांमध्येच देणार आहे.
त्यासाठी महापालिका पाडापाडीत घर गेलेल्या कुटुंबांना वॉर्ड कार्यालयाकडून मजूर परवाना देणार आहे. त्याचे संबंधिताला २ लाख रुपये मिळेल. तर पीएम आवासचे अडीच लाख, असे साडेचार लाख रुपयांचा लाभ बाधिताला घरासाठी मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित पाच ते ७ लाख रुपये बाधितांना उभे करावे लागणार आहे.
वाधितांना केवळ १ लाख रुपये भरून घर मिळावे, यासाठी महापालिका शहरातील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडासाठी प्रयत्न करणार आहे. त्यातून वाधितांना घर उपलब्ध करून देण्यासाठी फरकाचे ४ ते ६ लाख रुपये उभे करणार आहे. या प्रयत्नामुळेच बाधितांना १ लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे.