Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : बुलेटच्या चावीवरून दोन गटांत हाणामारी

घरात घुसून मायलेकावर कोयत्याने हल्ला; तर दुसऱ्या गटाकडून तरुणावर चाकूने वार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बुलेट गाडीची चावी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान मुकुंदवाडीतील जयभवानी नगर भागात दोन गटांत कोयता, चाकूहल्ल्यात झाले. एका गटाने घरात घुसून महिलेसह तरुणावर कोयत्याने हल्ला केला, तर दुसऱ्या गटाने 'माझ्या भावाला मारतो का?' असा जाब विचारत तरुणावर भररस्त्यात चाकूने वार केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांत तक्रार केल्याचा राग, घरात घुसून कोयत्याने हल्ला

पहिल्या प्रकरणात पवन ओमप्रकाश बुधवंत (१९, रा. गल्ली नं. १४, जयभवानी नगर) याने फिर्याद दिली आहे. ३१ ऑगस्ट रोजी पवनच्या मावशीची बुलेट गल्लीत उभी असताना आरोपी प्रज्वल ऊर्फ सोनू अहिरे आणि आशु मोरे यांनी गाडीची चावी मागितली होती. चावी न दिल्याने त्यांनी दगडाने बुलेटची तोडफोड केली. यावर पवनच्या वडिलांनी १ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली.

आपल्याविरुद्ध तक्रार केल्याचा राग मनात धरून, २ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता सोनू अहिरे, प्रणव अहिरे आणि आशु मोरे यांनी पवनच्या घरावर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर शिवीगाळ करत घरात घुसून त्यांनी सामानाची तोडफोड सुरू केली. पवनची आई मध्यस्थीसाठी आली असता प्रणवने त्यांच्यावर कोयता उगारला, जो त्यांच्या हाताला लागला. पवन वाचवायला गेला असता त्यालाही कोयता लागून तो जखमी झाला. त्यानंतर तिघांनी माय-लेकाला दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी कोणीतरी '११२' ला कॉल केल्याने पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली. पोलिसांचा आवाज ऐकताच आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी सोनू, प्रणव आणि आशु मोरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्या भावाला मारतो का?' चाकू आणि दगडाने वार

दुसऱ्या प्रकरणात आशिष नंदू मोरे (१९, रा. साई कॉलनी, मुकुंदवाडी) याने पवन बुधवंत आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे. आशिष हा १ सप्टेंबरच्या मध्यरात्री एका मित्राच्या घरभरणीच्या कार्यक्रमातून पायी घरी परतत होता. रात्री २ वाजेच्या सुमारास झेंडा चौकाजवळ त्याला पवन बुधवंत, बाळ्या बुधवंत, बळी पाटील आणि सावऱ्या यांनी गाठले. 'काय रे, तू जास्त मस्तीत आला का, माझ्या भावाला मारतो का?' अशी विचारणा करत बाळ्या बुधवंत याने आशिषला शिवीगाळ सुरू केली.

यावेळी पवनने दगडाने आशिषच्या डोक्यावर मारून जखमी केले. तर, सावऱ्याने चाकूने आशिषच्या हातावर वार केला. या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून आशिषने पळ काढला. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी पवन बुधवंत, बाळ्या बुधवंत, बळी पाटील आणि सावऱ्या या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT