ठळक मुद्दे
कर्नाटकातील पावसामुळे उदगीरमार्गे आलेले पाणी यामुळे मुखेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती
ग्रामस्थांचा सवाल : लेंडी धरण करण्याच्या अगोदर आमचे पुनर्वसन का केले नाही
पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी मुखेडला भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली
छत्रपती संभाजीनगर / नांदेड : ग्रामस्थांचा विरोध असूनही लेंडी धरणाच्या घळभरणीचे केलेले काम, मुखेड परिसरात झालेला ढगफुटीसदृश्य पाऊस, कर्नाटकात झालेल्या पावसामुळे उदगीरमार्गे आलेले पाणी यामुळे मुखेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. त्यातच बुडीत क्षेत्रातील ग्रामस्थांनी त्यांना दिलेल्या जागी जाण्यास दिरंगाई केल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचे उदाहरण म्हणजे मुखेडचा पूर असे सकृतदर्शनी दिसते.
मुखेड तालुक्यातील धरणक्षेत्राखालील असलेल्या रावणगाव, दोन्ही भाटापूर, भासवाडी, हसनाळ, भेंडेगाव, रावी, भिंगोली, कोळनूर इत्यादी गावांना पुराचा फटका बसला. हसनाळ या गावाचे तर मोठे नुकसान झाले. घरात पाणी आले, बघता बघता टोंगळ्यापर्यंत आले.. हातात तीन महिन्यांचे बाळ (नातू) घेऊन काही वस्तू, पैसे ठेवलेले शोधावे म्हटले तर पाणी कमरेपर्यंत आले. घराच्या पुढे पाणी खूप असल्याने मागचा दरवाजा तोडेपर्यंत पाणी डोक्यापर्यंत आले... दरवाजा निघाला म्हणून आम्ही कुटुंबीय वाचलो... बाळाला डोक्यावर घेऊन माळावर पोहोचलो... धो धो पाऊस आणि पुढे मरण या परिस्थितीत रात्र काढली. चार म्हशी मरण पावल्या... धरण करण्याच्या अगोदर आमचे पुनर्वसन का केले नाही असा सवाल माजी सरपंच व्यंकटराव लालू जुरावाड यांनी केला. त्यामुळे पुरात मरण पावलेल्या पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. अखेर मंगळवारी (दि.19) पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी मुखेडला भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
1. रविवारी (दि.17 ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस हे मुखेड परिसरात आलेल्या पुराचे प्रमुख कारण आहे. अवघ्या 5-6 तासांत सुमारे सव्वादोनशे मि.मी. पाऊस झाला. त्यामुळेे लेंडी नदीला पूर आला आणि पाणी पातळीत आठ मीटरने वाढ झाली.
2. मुखेड नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागात असलेल्या लेंडी नदीच्या उपनद्यांना पूर आला. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानेही पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
3. लेंडी धरणाची घळभरणी हे पुरामागील कारण असल्याचे ग्रामस्थांना वाटते. त्यांचा रोष लेंडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांवर आहे. (घळभरणी म्हणजे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याच्या ठिकाणी मजबुतीकरण करणे.) या कामामुळे वास्तविक धरण मजबूत होते, पण या कामाला ग्रामस्थांचा विरोध होता. आधी पुनर्वसन करा मगच घळभरणीचे काम करा, अशी त्यांची मागणी होती. अर्थात प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी पोलिसी बळाचा वापर करून घळभरणीचे काम पूर्ण केले.
4. प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणार्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. पण तेथे सुविधा नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी जाण्यास नकार दिला. परिणामी लेंडीच्या पुराने गावांना कवेत घेतले व जिवीत व पशू हानी झाली.
5. प्रकल्प पूर्ण न होता घाईघाईन काम करण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह रोखला गेला आणि अचानक पूरस्थिती उद्भवली.
लेंडी नदी कोणत्या भागातून वाहते?
लेंडी नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, ती महाराष्ट्र - कर्नाटक - तेलंगणा राज्याच्या सीमांतर्गत भागातून वाहते, महाराष्ट्रातून लातूर (उदगीर) नांदेड (मुखेड व देगलूर) जिल्ह्यात जाते. या उपखोर्यात दोन जिल्ह्यातील 7 तालुके 269 गावे येतात. ही नदी देगलूर तालुक्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र-तेलंगणाच्या संयुक्त विद्यमाने मुखेड तालुक्यातील गोणेगाव-इटग्याळ येथे धरणाचे काम सुरू आहे. 1986 साली तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. परंतु नंतर काहीच हालचाल झाली नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंडतर त्यांनी या विषयात लक्ष घालून पाठपुरावा केल्यानंतर 2200 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु मनाप्रमाणे मावेजा मिळत नसल्याने बुडीत क्षेत्रात नाराजी आहे.
लेंडी धरणाचे काम पूर्ण झाल्यास 26 हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असुन 30 हजार व त्यापेक्षाही जास्त शेतकर्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुखेड व देगलुर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटणार आहे, ही वस्तुस्थिती असली तरी या पुरामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.