

किनवट : शनिवार-रविवारच्या मुसळधार पावसासह ईसापूर धरणाच्या सांडव्याची तब्बल तेरा वक्रद्वारे 50 सेंटीमीटरने सोडण्यात आले. या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यात हाहाकार माजला आहे.
शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या, जनावरे मृत्युमुखी पडली, गावोगावी पुराचे पाणी शिरले, तर रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला असून, या नैसर्गिक संकटाने नागरिक अक्षरशः बेहाल झाले आहेत.
सिंदगीमोहपूर मंडळातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आदी पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. सिंदगी येथील शेतकरी संदीप शिवाजी शिरडकर यांच्या गोठ्यातच बांधलेल्या नऊ ते दहा जनावरांचा पुराच्या पाण्याने बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. गावात नाल्याचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठ्याची विहीर कोसळली, तर निचपूर येथील तीन विहिरीही पाण्याच्या तडाख्याने खचल्या. मारेगाव, आंजी, मोहपूर, सिंदगी, धानोरा, दहेली, रामपूर नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरले. तसेच निचपूर,रायपूर ,बोरगाव व या गावांमध्ये पुराच्या पाण्याचा मोठा लोंढा शिरला. परिणामी गावातील घरांचे नुकसान,पडझड झाली. विहिरीतही पाणी शिरल्याने त्यात गाळ साचला. शेतातील अनेकांचे स्प्रिंकलर सेट वाहून गेले. तर अनेकांचे जनावरांचे गोठे व सौरपॅनल संच उध्वस्त झालेत.
आमदार भीमराव केराम हे कालपासून पूरस्थितीवर लक्ष ठेवून असून, प्रशासनाशी सतत संपर्क साधून आवश्यक त्या सूचना देत आहेत. महसूल प्रशासनाने तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नालागड्डा, मोमीनपुरा, गंगानगर व बेल्लोरी येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. बोधडी येथे पुरात अडकलेल्या दोन नागरिकांची सुटका तातडीने करण्यात आली.
पैनगंगा नदीकाठच्या कृष्णप्रिय गोशाळेत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. प्रतिक केराम, आनंद मच्छेवार, स्वागत आयनेनीवार आदींनी गायी-वासरांना वाचवण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा केला. लहान वासरे तर हातावर उचलून सुरक्षित स्थळी पोहोचवावी लागली. पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश धोंड व त्यांच्या चमूने जखमी जनावरांवर तातडीने उपचार केले व पशुधनाला सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान, माहूर – वानोळा – निचपूर – राजगड – किनवट हा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. निचपूर-राजगड नाल्यावरील पुलाचे मोठे नुकसान झाल्याने वाहतूक ठप्प झाली. अशा कठीण प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी तत्परतेने मदतकार्य करत अडथळे दूर करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. महसूल प्रशासन सातत्याने जिवित व वित्तहानीचा आढावा घेत असून, मदतकार्याला गती दिली जात आहे.