छत्रपती संभाजीनगर : येथून इतर राज्यात प्रवासी सेवा देणाऱ्या मुक्कामी बसच्या चालक वाहकांना राहण्याची व्यवस्था एसटी प्रशासन करते. असे असतानाही काही ठिकाणी प्रशासनाने चालक वाहकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे तर काही ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने चालक वाहकांना बसमध्येच मुक्काम ठोकावा लागत आहे. प्रशासनाच्या या दुहेरी नीतीबाबत चालक-वाहकांत नाराजी पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगरातून निजामबाद, सुरत आणि बऱ्हाणपूरला बस सेवा सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी येथील आगाराच्या मुक्कामी बस आहेत. यापैकी निजामाबादला चालक वाहकांच्या मुक्कामांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सूरत आणि बऱ्हाणपूरला चालक-वाहकांच्या प्रशासनाने मुक्कामाची व्यवस्था केली नसल्याने त्यांना बसमध्येच मुक्काम करावा लागत आहे.
विशेष म्हणजे दिवसभरांची कॅश त्यांच्या जवळच असल्याने जोखीम घेऊन रात्री काढावी लागत आहे. याअसुरक्षित मुक्कामामुळे चालक वाहकांना पूर्ण आरामही मिळत नाही. प्रशासनाला या बाबत पूर्ण माहिती असूनही त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.