

छत्रपती संभाजीनगर : सण-उत्सव शांततेत आणि डीजेमुक्त वातावरणात साजरे व्हावेत म्हणून पोलिस प्रशासनाने बैठका घेऊन नियमावली जाहीर केली खरी. मात्र दांडिया आणि गरव्याच्या नावाखाली शहरातील पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स आणि खासगी लॉन्सवर या नियमांचा अक्षरशः कचरा केला जात आहे. रात्रीच्या वेळी कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या दणदणाटात सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण विषयक आदेशांची उघड पायमल्ली सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, खंडपीठाने ध्वनीप्रदूषणावर वारंवार ताशेरे ओढले, त्यापासून हाकेच्या अंतरावर पंचतारांकित हॉटेलांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडून दांडियाचे फड रंगत असताना पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र कानावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून रात्री १० नंतर आणि निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक वाजवण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी कार्यक्रमात आवाजाची विहित मर्यादा ओलांडल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही शहरात आयोजित गरब्यांमध्ये नियमांचे कोणतेही सोयरसुतक उरलेले नाही. बेसच्या प्रचंड आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत.
शहरातील जालना रोडवरील उच्च न्यायालय खंडपीठाच्या काही अंतरावर पंचतारांकित हॉटेल्स, जालना रस्त्यावरील लॉन्स आणि बड्या व्यावसायिक मैदानांवर भव्य गख्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी हजारो तरुणाईच्या उपस्थितीत महाकाय साऊंड सिस्टीम आणि डीजेच्या भिंती उभारून दणदणाट सुरू आहे.
हायकोर्टाच्या हाकेच्या अंतरावर रात्री उशिरापर्यंत बेसचा थरथराट सुरू असतानाही प्रशासन तिथे कारवाई करत नाही. उलट हॉटेल्स समोर भररस्त्यात वाहने लावण्यात येत असल्याने पोलिसांवर वाहतूक कोंडी सोडविण्याची नामुष्की ओढवली आहे. साऊंड सिस्टीम जप्त करणे दूरच राहिले. सर्वसामान्यांच्या गणेशोत्सवात आवाजाची मोजणी करणारे प्रशासन या बड्या हॉटेलचालकांच्या दांडियासमोर हतबल का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
इनडोअरच्या नावाखाली लॉनवर दणदणाट
सध्या शहरातील विविध हॉटेल्स, बंदिस्त हॉल आणि लॉन्सवर गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून "इनडोअर" (बंदिस्त सभागृह) कार्यक्रमाची परवानगी मिळवायची आणि प्रत्यक्षात मात्र हॉटेलच्या मोकळ्या लॉन्स व मैदानांवर महाकाय साऊंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाट करायचा, अशी नवी शक्कल आयोजकांनी शोधून काढली आहे.
बेसच्या प्रचंड हादऱ्यांमुळे जालना रोड, टाऊन सेंटर आणि आसपासच्या संपूर्ण परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गल्लीबोळातील लहान मंडळांनी साधा लाऊडस्पीकर लावला तरी गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवणारे प्रशासन पंचतारांकित हॉटेल्स आणि नामांकित लॉन्सवर साऊंड लेव्हल मीटर घेऊन तपासणी का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळी ६ ते रात्री १० आवाजाच्या कायदेशीर मर्यादा काय ?
१) शांतता क्षेत्र (रुग्णालय, शिक्षण संस्था व न्यायालय परिसर) ५० डेसिबल
२) निवासी क्षेत्र ५५ डेसिबल
३) व्यावसायिक क्षेत्र ६५ डेसिबल
४) औद्योगिक क्षेत्र ७५ डेसिबल
शांतता क्षेत्र : न्यायालय, शासकीय रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरामध्ये ध्वनिक्षेपक वाजवण्यास सक्त मनाई
आमच्या जयंतीलाच कायद्याचा धाक का ? - गरब्याच्या ठिकाणी काही देवीची स्थापना झालेली नाही. उत्सवाच्या नावाखाली केवळ पैसे कमविण्यासाठी पंचतारांकित हॉटेल, मॉलमध्ये गरबा सुरू आहेत. शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणेशउत्सवला डीजे बंदी, डेसिबल मर्यादा लादली जाते. कायदा काय आमच्या उत्सवासाठीच आहे का? पोलिसांना धनदांडग्यांचा दणदणाट ऐकू येत नाही का? हे प्रकार तत्कळ बंद करावे.
गणेश उगले पाटील, संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर छावा संघटना