

सिल्लोड : विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा हायवा महसुलच्या पथकाने पकडला. तर पथकातील महसूल कर्मचाऱ्यांना धमकावत हायवा थेट अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १५) रात्री तालुक्यातील पेंडगाव शिवारात घडली. दुसऱ्या कारवाईत बुधवारी (दि. १४) सकाळी मादनी- नाटवी रस्त्याने महसुलच्या पथकाने एक हायवा पकडून जप्त केला. तर तिसऱ्या कारवाईत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १५) रात्री साडे सातच्या सुमारास शहरात एक हायवा पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केला.
श्याम चोपडे, योगेश दादाराव मोरे (दोघे रा. घाटनांद्रा) अशी अंगावर हायवा घातल्या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर नकुल अण्णा तांबडे (रा. केदारखेडा, ता. भोकरदन) असे मादनी - नाटवी रस्त्यावर पकडलेल्या हायवा प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरात गुरुवारी (दि. १५) रात्री पकडलेल्या हायवा प्रकरणी आज शनिवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सागर वाघमारे यांनी दिली.
गुरुवारी रात्री ग्राम महसूल अधिकारी विशाल दुनगहु, पेंडगावचे पोलिस पाटील यांनी विना क्रमांकाच वाळू वाहतूक करणारा एक हायवा अडविला. चालकाला हायवा तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगत असताना एका कारमधून श्याम चोपडे,योगेश मोरे आले. त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धमकावत हायवा अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत मादनी- नाटवी रस्त्यावर ग्राम महसूल अधिकारी विष्णू गवळी, किरण तायडे यांना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास विनाक्रमांक असलेला हायवा वाळू वाहतूक करताना मिळून आला. त्यांनी ही माहिती मंडळ अधिकारी मनीष खरे यांना दिली. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी हायवा जप्त करीत आरोपी नकुल तांबडेवर अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तिसऱ्या घटनेत गुरुवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास शहरात हायवा क्र (एमएच- २८, बीबी- ०९९६) वाळू वाहतूक करताना मिळून आला. पथकाने ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित काइंगडे यांना दिली. तर माहिती मिळताच तहसीलदार सागर वाघमारे यांनी हायवा जप्त केला.
उपविभागीय अधिकारी अॅक्शन मोडवर
उपविभागीय अधिकारी विश्वजित काइंगडे यांचा अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवायांचा धडाका सुरूच आहे. त्यांनी वाळू वाहतूक करणारे वाहने पकडून जप्त करीत गुन्हे दाखल केल्याने वाळू तस्करांची चांगलीच कोंडी झाली आहे. उपविभागीय अधिकारी अॅक्शन मोडवर आल्याने वाळू वाहतुकीला लगाम बसला असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
पकडलेल्या वाळू वाहतूक करणारे वाहन व आरोपींवर तिहेरी कारवाया करण्यात येणार आहे. यात पहिल्या कारवाई दंडात्मक कार्यवाही प्रास्तवित करण्यात येणार आहे. दुसऱ्या कारवाई पोलिसांत गुन्हा दाखल करणे. तर तिसऱ्या कारवाईत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देऊन सदर वाहनांचा परवाना रद्द करणे, तसेच चालकाचा परवानाही रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. महसूलचे पथक रात्रीची गस्त घालत असून अवैध गौण खनिजविरोधात कारवाया करण्यात येत आहे.
सागर वाघमारे तहसीलदार, सिल्लोड