एमपीएससी पेपरफुटीविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी विद्यार्थी. (दुसऱ्या छायाचित्रात) विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आमदार रोहित पवार. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

MPSC paper leak protest : छत्रपती संभाजीनगरात एमपीएससी पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत निघाला मोर्चा; जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.११) छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आमखास मैदान ते विभागीय आयुक्तकार्यालयमार्गे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यामध्ये आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. यासह आदी मागण्या मांडण्यात आल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून, चौकशीअंती आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, गट-ब परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ८ दिवसांच्या आत स्पष्ट व अधिकृत स्पष्टीकरण द्यावे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५, कृषीसेवा परीक्षा तसेच इतर वर्णनात्मक परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये मानवी चुका किंवा अनियमिततेबाबत उपस्थित झालेल्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, मुंबई क्राईम ब्रांचकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल, कायदेशीर बाबींचे पालन करून, सार्वजनिक करण्यात यावा, तपासाची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, तपासाच्या कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊन, महत्त्वाच्या घडामोडी व निष्कर्षांबाबत वेळोवेळी अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात यावी यासह आदी मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी सुशील बोर्डे, प्रकाश इंगळे, कुणाल खरात, द्विग्विजय शिंदे, भूषण तांबे, महेश जाधव, मोहित जाधव, अभिषेक शिंदे, रोहित वाघूले, अनंत कऱ्हाळे, सचिन जाधव, आनंद मगरे सह आदींनी सहभाग नोंदविला.

सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करावी : आ. रोहित पवार

परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारने समिती नेमली, त्याचे स्वागत आहे. मात्र केवळ समिती किंवा एसआयटी नेमून प्रश्न सुटणार नाही. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी छत्रपती संभाजीनगरात मोर्चादरम्यान केली. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, माझ्याकडे काम नाही म्हणून मी पेपरफुटीवर बोलतो, अशी टीका केली जाते. मात्र सरकारनेच काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे मान्य केले आहे.

वर्ग 'क'ची परीक्षा पुढे ढकलावी लागली, हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा. आज पाऊस पडत नाही शेतकरी बांधव त्रस्त आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलांना पालकवर्ग शिक्षण देतात. त्यात कष्टकरी बांधवांच्या कुटुंबातील विद्यार्थी एमपीएससी परीक्षेसाठी मेहनत घेतात. त्यात असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT