Sambhajinagar News : अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकणाऱ्या निर्दयी मातेला अटक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकणाऱ्या निर्दयी मातेला अटक

कुत्र्यांनी रस्त्यावर दोनवेळा ओढले; रडण्याच्या आवाजामुळे तरुणाने वाचविले

पुढारी वृत्तसेवा

Mother arrested for throwing away born baby from an illicit relationship

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात गोंडस बाळाला तासाभरातच निर्दयी मातेने गोणीत भरून पुंडलिकनगर रस्त्यावरील दुभाजकामध्ये टाकले. कुत्यांनी बाळाला दोनवेळा गोणीसह ओढले. मात्र रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्याने काही लोकांना सोबत घेऊन बाळाला घाटीत दाखल केले. हा प्रकार गुरुवारी (दि. २८) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, पुंडलिकनगर पोलिसांनी काही तासांतच निर्दयी मातेचा शोध घेऊन रात्री तिला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

फिर्यादी भागेश राजू पुसदेकर (२८, रा. आदर्श कॉलनी, पुंडलिकनगर) हे पाटबंधारे जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ते मूळगाव अंजनगाव सुरजी येथून सुटी संपवून पहाटे ५:५० वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर येथील घराकडे निघाले होते. जाताना त्यांना रस्त्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा भागेश व काही लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात नवजात अर्भक आढळून आले.

त्यांनी तात्काळ बाळाला खासगी रुग्णालयात नेले. तेथून घाटीत उपचारासाठी दाखल केले. तसेच पुंडलिकनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस अंमलदार सचिन जाधव, तारख, अमोल राठोड यांनी धाव घेतली. भागेश यांनी दाखविलेल्या प्रसंगाधावनामुळे आणि पुंडलिकनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे बाळ सुखरूप असून, त्याच्यावर लवकर उपचार सुरू झाले. याप्रकरणी भागेश यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

घरातच एकटीने जन्म देऊन तासाभरात फेकले

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी (२४, नाव बदललेले) ही वाशीम जिल्ह्यातील असून, पुंडलिकनगर भागात पतीपासून विभक्त राहते. ती एका कंपनीत काम करते. यादरम्यान तिचे एकाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून सोनाक्षीने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास गोंडस बाळाला घरीच जन्म दिला. स्वतःच एकटीने तिने प्रसूतीही केली. त्यानंतर घरच्यांपासून लपविण्यासाठी तिने पहाटे पाच वाजेच्या सुमारास बाळाला गोणीत भरून पुंडलिकनगर रस्त्यावरील दुभाजकात फेकले.

▶ कुत्र्याने रस्त्याच्या मधोमध ओढले

अर्भक असलेली गोणी कुत्र्याने दुभाजकाच्या आतून ओढून रस्त्याच्या मधोमध आणून सोडली. कुत्रे 1 मोठमोठ्याने भुंकत होते. तसे बाळही रडत असल्याने त्याच्या आवाजामुळे कुत्रे दूर पळत असावेत, असा अंदाज आहे. सुमारे तासभर अर्भक कुत्रे आणि रस्त्यावरील वाहनांच्या तावडीत सापडलेले होते.

▶ गाडीच्या खाली येता येता राहिले

सकाळपासूनच पुंडलिकनगर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती. कंपन्यांमध्ये जाणारी वाहने सुसाट धावतात. कुत्र्याने गोणी रस्त्याच्या मधोमध आणून २ ठेवल्याने वाहनांच्या खाली येण्याचा धोका निर्माण झाला होता. सीसीटीव्हीत सर्व घटना कैद झाली आहे. एक गाडी तर चक्क गोणीच्या मधोमध निघून गेली. मात्र दैव बलवत्तर म्हणून बाळ थोडक्यात बचावले. त्यानंतर कुर्त्यांनीच पुन्हा अर्भकची गोणी रस्त्याच्या कडेला ओढत आणली होती.

» तिच्या चपलेवरून लावला पोलिसांनी शोध

अर्भक सापडल्यानंतर पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी तात्कळ उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांना तपासाच्या सूचना दिल्या. राऊत यांनी उपनिरीक्षक सुनील म्हस्के, अंमलदार संदीप बिडकर, विलास डोईफोडे, प्रशांत नरवडे, अजय कांबळे, स्वाती राठोड, गिरीजा आंधळे यांच्यासह अर्भक फेकणाऱ्या मातेचा शोध सुरू केला. पुंडलिकनगर रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात सोनाक्षीची चप्पल ठळकपणे दिसत होती. त्यानंतर पुंडलिकनगरच्या सर्व गल्ल्यांमध्ये, घरासमोरील चप्पलचा शोध घेतला. त्यावरून अवघ्या काही तासांत सोनाक्षीला पोलिसांनी निष्पन्न केले. तिच्या प्रियकराचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT