

पैठण पुढारी वृत्तसेवा:- एक आठवड्यापासून पैठण येथील नाथसागर धरणाचे दरवाजे उघडे असून. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने गुरुवारी दि.२८ रोजी धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे क्र.१० ते २७ अडीच फुट उंचीवर उघडले. गोदावरी नदीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याच्या विसर्ग मध्ये वाढ करण्यात केल्याची माहिती धरण उप अभियंता मंगेश शेलार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले आहे.
पैठण तालुक्यातील पडत असलेल्या पावसासह नाथसागर धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी येथील धरणात उपलब्ध होत असल्याने व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नाथसागर धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. ४७ हजार १६५ क्युसेक या वेगाने पाण्याची आवक येत असल्याने गेल्या आठवड्यापासून गोदावरी नदी पात्रात कमी अधिक विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पैठण ते नांदेड गोदावरी नदीवरील बंधारे पुर्ण क्षमतेने भरल्याने गोदाकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचन औद्योगिकनगरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
गुरुवारी रोजी वरील धरणातून येणारी पाण्याची आवक वाढ झाल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आल्यानंतर धरणाचे अठरा दरवाजे दुपारपर्यंत एक फुटावरुन दोन फुट उचलून ४७ हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता परंतू. येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नाथसागर धरणाचे दरवाजे गुरुवार रोजी रात्री आठ वाजता अडीच फूटाने खुले करून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे रात्री गोदावरी नदीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातील पाणीसाठा ९८.६२ टक्के झाला असून पाणीपातळी १५२१.७५ फुट तर ४६३.८२९ मिटर मध्ये नोंद झाली आहे.
नाथसागर धरण सक्षमतेने भरलेल्या असल्याने धरणाची पाणीपातळी स्थिर व नियंत्रित ठेवून पाण्याच्या आवकीनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहीती कार्यकारी अभियंता प्रशांत संत, तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी दिली आहे.