Siddharth Udyan : सिद्धार्थ उद्यानामुळे मॉर्निंग वॉक बंद, मनपाच्या भूमिकेवर वृद्धांचा संताप File Photo
छत्रपती संभाजीनगर

Siddharth Udyan : सिद्धार्थ उद्यानामुळे मॉर्निंग वॉक बंद, मनपाच्या भूमिकेवर वृद्धांचा संताप

महिना उलटूनही निर्णय नाहीच

पुढारी वृत्तसेवा

Morning walk closed due to Siddharth Udyan, elderly angry over Municipal Corporation's stance

छत्रपती संभाजीनगर, पुढरी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर दुर्घटना घडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ११ जूनपासून उद्यान नागरिकांसाठी बंद ठेवले आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे दीडशेहून अधिक वृद्धांचे मॉर्निंग वॉक बंद झाले आहे. परिसरातील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान असल्याने अनेकांनी महापालिकेच्या भूमिकेवरच आता संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

शहरात महापालिकेचे मोजकेच उद्यान आहेत. त्यातही नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्यासाठी अगदी क्वचितच उद्याने सुस्थितीत आहेत. त्यात सिद्धार्थ उद्यान हे शहराच्या मध्यवर्ती भागात मोडणारे उद्यान असून, त्यामध्ये दररोज शहराच्या कानाकोपर्यातून हजारो पर्यटक विरंगुळ्यासाठी येत असतात. एवढेच नव्हे तर दररोज समर्थनगर, गरमपाणी, मिलकॉर्नर, म्हाडा कॉलनी या परिसरातील सुमारे दीडशेहून अधिक वृद्ध आणि तेवढ्याच संख्येने ३० ते ५० वयोगटातील पुरुष, महिला, तरुणतरुणी मॉर्निंग वॉकसाठी या उद्यानात येत असतात.

दरम्यान, गेल्या महिन्यात या उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग दोन महिलांच्या अंगावर कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर लागलीच प्रशासक जी. श्रीकांत यांनी उद्यान ७ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने या प्रवेशद्वाराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले. मात्र या ऑडिटलाच दोन आठवडे लागले. त्यात प्रवेशद्वाराचे स्ट्रक्चर योग नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवेशद्वार तोडण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रवेशद्वार तोडण्याची प्रक्रिया सुरू केली अन् काही तासांतच तिला ब्रेक दिला. त्यानंतर महिना उलटूनही ना प्रवेशद्वार पाडले, ना प्रवेशद्वाराच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली, ना सिद्धार्थ उद्यान सुरू केले. प्रशासनाच्या याच भूमिकेवर सध्या नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

आम्ही फिरायचे कुठे...

सिद्धार्थ उद्यानलगतच्या परिसरातील नागरिक दररोज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून उद्यान केव्हा सुरू करताय, याबाबत विचारणा करीत आहेत. तसेच उद्यान बंद केल्याने आम्ही मॉर्निंग वॉकसाठी जायचे तरी कुठे, असा सवाल उपस्थित करून संताप व्यक्त करीत आहेत.

लाखोंचे नुकसान

प्राणिसंग्रहालयात प्रवेशासाठी बच्चेकंपनीला २५ रुपये तर प्रौढांना ५० रुपये शुल्क आकारले जाते. तर उद्यानात प्रवेशासाठी बच्चेकंपनीला १० रुपये आणि प्रौढांना २० रुपये शुल्क असते. त्यानुसार उद्यानातून महिन्याला किमान १२ ते १५ लाखांचे उत्पन्न मिळते. या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT