MLA Ambadas Danve: Supply water by the fourth day, or we will take to the streets
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात उन्हाच्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईदेखील वाढली आहे. १ जानेवारी ते १२ मेपर्यंत १३३ दिवस झाले आहेत. या कालावधीत शहराला किमान ४४ वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १५-१६ वेळाच पाणीपुरवठा झाला आहे. प्रशासनाकडून चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक भागांना १० ते १५ दिवसांआड पाणी मिळत आहे? असा सवाल उपस्थित करीत पाण्याचे गॅप कमी करा, नसता शिव सेना रस्त्यावर उरले, असा इशारा राज्याचे माजी विरोधीपक्ष नेता आमदार अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांना दिला.
शहराच्या मध्यवर्ती भागातील गुलमंडी, संभाजीपेठ, नारळीबाग, नागेश्वरवाडी, दलालवाडी, चौराहा, फकिरवाडी यासह शहागंज यांसारख्या भागांत १५ ते १६ दिवसांनी पाणी मिळत असून, अनेक भागांत रात्री २ वाजता पाणी सोडले जात आहे. सातारा परिसरातील नागरिकांचे विशेष हाल होत असून, तेथे पाण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे.
सातारा परिसरात टाक्यांद्वारे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन खैरे, गोपाल कुलकर्णी, हरिभाऊ हिवाळे यांनी केली. चिकलठाणा, रामनगर भागात १४ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, रात्री-अपरात्री पाणी सोडले जात असल्याची तक्रार रामेश्वर कोरडे यांनी केली. बाळासाहेब थोरात यांनी पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अभियंत्यांनी उभे राहून पाणीपुरवठा सुरळीत करावा, विद्युतपुरवठा खंडित होऊ देऊ नये, अशी सूचना केली.
महिला आघाडीच्या सुकन्या भोसले यांनी नो-नेटवर्क भागातील नागरिकांनी पैसे भरूनही त्यांना आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे. टँकरचालक वेगवेगळे कारण देऊन पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. छाया देवराज यांनीदेखील सिडको भागात पाण्याची वेळ नसल्याने महिलांना दिवसरात्र पाण्याची वाट पाहत बसावी लागते.
अशी तक्रार केली. शिवसेना गटनेते गणेश लोखंडे, नगरसेविका सावित्री वाणी यांनीदेखील पडेगाव, मिटमिटा भागात १२ ते १४ दिवसांआड पाणी मिळत असून, अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे महापालिकेने शहरवासीयांना चार दिवसांआड पाणीपुरवठ सुरू करावा. नसता ठाकरे सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आमदार दानवे यांनी दिला. यावेळी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, नगरसेवक रशीद मामू खान, हनुमान शिंदे, सावित्रीबाई वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.