MJP diverts 900 litres of water for MBR testing
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरासाठीच्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर सहा दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला होता. परंतु काम लांबल्याने तब्बल १८ दिवस या जलवाहिनीचे पाणी बंद राहिले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू होत नाही तोच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने परस्पर नव्या एमबीआरच्या चाचणीसाठी ९०० चे संपूर्ण पाणी वळविले. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागाला माहिती मिळाल्यानंतर ३० टक्के पाणी चाचणीसाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अमृत पेयजल योजने अंतर्गत शहरासाठी २७४० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. महार ाष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे या योजनेची कामे सुरू असून, डिसेंबरअखेर शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी देण्याचे मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, मुख्य २५०० मिमी व्यासाची जलवाहिनीवरील गॅप जोडण्यासाठी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर सहा दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला होता.
परंतु हा शटडाऊन १८ दिवसांवर गेला. मंगळवारी (दि.२) रात्री उशिरा ९०० तून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु महापालिकेला माहिती न देताच एमजेपीने बुधवारी (दि. ३) रात्री अचानक या जलवाहिनीचे संपूर्ण पाणी हे नक्षत्रवाडी येथे तयार केलेल्या नव्या एमबीआरच्या चाचणीसाठी वळविण्यात आले. ९०० चे पाणी अचानक बंद झाल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने माहिती घेतली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ११ एमएलडीची क्षमता असलेल्या या एमबीआरसाठी ३० टक्के पाणी घ्यावे आणि ७० टक्के पाणी शहराला द्यावे, अशी सूचना पाणीपुरवठा विभागाकडून एमजेपीला करण्यात आली. त्यानुसार गुरुवार (दि.४) पासून ९०० तून शहराला पाणी येणे सुरू झाले.
दोन दिवसांपूर्वीच सुरू झालेली ९०० ची लाईन
टाकळी फाटा येथील २५०० मिमी पाईपलाईन जोडणीसाठी १७ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचे शटडाऊन घेण्यात आले होते. मात्र काम लांबल्याने ९०० मिमी जलवाहिनी तब्बल १७दिवस बंद राहिली. १८ दिवसांनी मंगळवारी रात्री ही लाईन सुरू झाल्यानंतर शहराला वाढीव २६ एमएलडी पाणी मिळाले होते. पण दोनच दिवसांत हीच लाईन एमबीआर चाचणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पाणीपुरवठा योजनेत समन्वयाचा अभाव ?
शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असली तरी मनपा आणि प्राधिकरणातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असल्याची चर्चा शहराभर रंगली. डिसेंबर अखेर शहराला २०० एमएलडी वाढीव पाणी देण्याचे नियोजन असून, त्यासाठी ९०० मिमी जलवाहिनी हा मुख्य आधार आहे.