

Crime against two people who were injured by hitting them with a sharp object
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
तू माझ्याविरुद्ध इंस्टाग्रामवर स्टोरी का टाकतो, अशी विचारणा करणाऱ्याला तसेच मध्यस्ती करणाऱ्याच्या गळ्यावर धारदार वस्तू मारून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री रांजणगाव येथे घडली. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, निखिल राठोड (१७) व आदित्य काकडे (१७, दोघे. रा. रांजणगाव) हे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मित्राला नोटबुक देण्यासाठी कमळापूर येथे जात होते. यावेळी रांजणगाव येथील मातोश्रीनगरजवळ त्यांना त्यांचा मित्र ओम मनीष नागपुरे हा भेटला. तेव्हा निखिल याने ओम यास तू माझ्याविरुद्ध इंस्टाग्रामवर स्टोरी का लावतो.
आपले काही वाद असेल तर आपण मिटवून घेऊ, असे समजावून सांगितले. याचा ओमला राग आल्याने त्याने निखिलला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. यावेळी आदित्य काकडे हा मध्यस्ती करण्यासाठी आला असता ओम याने त्याच्या जवळील धारदार वस्तू निखिल व आदित्य यांच्या गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी निखिल राठोड याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ओम नागपुरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.