Minister Save's car was smeared with black paint, and MP Karad was verbally abused.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलून नव्यांना संधी दिल्याने संभाजीनगर भाजपात नाराजांचा संताप उफाळून आला. दुसऱ्या दिवशीही निष्ठावंत नाराजांनी भाजपचे प्रचार कार्यालय गाठत मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासले. तसेच खासदार डॉ. भागवत कराड यांना घेराव घालत शिवीगाळ केली. दोन इच्छुकांनी तर नेत्यांची बाजू घेणाऱ्या पदधिकार्यांच्या कानशिलातच लगावली. याशिवाय डावललेल्या नाराजांनी दिवसभर प्रचार कार्यालयात गदारोळ केला. आक्रोश घालणाऱ्या इच्छुकांमुळे नेत्यांना कार्यालयात पायही ठेवता आला नाही.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. ऐनवेळी युती तुटल्याने उमेदवार निश्चित करताना भाजप नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जुने, नवे कार्यकर्ते असा समतोल राखून भाजपकडून उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. यात सतत आंदोलने आणि पक्षाच्या विविध कार्याक्रमांना हजर रा-हणाऱ्यांनाच उमेदवारी देणे हा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. परंतु उमेदवार जाहीर होताच भाजपच्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या भाग्यनगर येथील प्रचार कार्यालयात येऊन गोंधळ घातला.
अनेकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. हा उद्रेक मंगळवारी दुपारपर्यंत कायम राहिला. त्यानंतर एका महिला कार्यकर्तीने प्रचार कार्यालयातच उपोषण सुरू केले. हे होत नाही तोच, बुधवारी सकाळपासून पुन्हा भाजप कार्यालयात राडा सुरू झाला. भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक नेते प्रचार कार्यालयात येण्यापूर्वीपासूनच उमेदवारी नाकारलेल्या नाराजांनी कार्यकर्त्यांसह प्रचार कार्यालय गाठले.
तेथे नेत्यांची प्रतीक्षा करीत बसले. नेते गाडीतून कार्यालयात आल्याचे कळताच अनेकांनी बाहेर गाडीत त्यांना गाठले. यात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड हे दोन्ही नेतेही होते. दोघांनाही कार्यकर्त्यांनी उमेदवारी नाकारल्याचा जाब विचारला. त्यासोबतच काहींनी कराड यांच्या गाडीला घेराव घालून अर्वाच्च भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे तर शिवीगाळही केली. तर काही संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांच्या गाडीला काळे फासून रोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा संताप पाहून या नेत्यांनी कार्यालयाच्या बाहेरूनच काढता पाय घेतल्याचे दिसून आले.
पीएला उमेदवारी : २० ते २२ वर्षांपासून पक्षाचे काम करून आणि पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात ७० ते ८० टक्क्यांवर असताना सागर पालवे यांना उमेदवारी देण्यात आली. तो, मंत्री अतुल सावेंचा पीए आहे, असा आरोप प्रशांत भदाणे पाटील यांनी केला.
कानशिलात लगावली
भाजपच्या प्रचार कार्यालयात संताप व्यक्त करणाऱ्या भदाणे दाम्पत्याची पदाधिकारी राजू खाजेकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु समजूत काढताना खाजेकर यांनी मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांचे नाव घेताच प्रशांत भदाणे पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर खाजेकर बाजूला झाले.
भाजप नव्हे प्रायव्हेट पार्टी
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि खासदार भागवत कराड यांनी पक्षाला प्रायव्हेट पार्टी केले आहे. स्वतःचा पक्ष असल्यासारखेच त्यांनी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या नातेवाइकाला उमेदवारी दिली. जातीभेद करतात, असा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला.
कार्यालयास छावणीचे स्वरूप
भाजपच्या भाग्यनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात नाराज कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर तातडीने पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला. दंगा नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या कार्यालय परिसरात ठाण मांडून असल्याने सध्या भाजप कार्यालयाला पोलिसी छावणीचे स्वरूप आले आहे.
महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
एका नाराज महिला कार्यकर्तीन मंत्री येताच बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.