छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड येथील उपोषणकर्त्याला रुग्णवाहिकेतून बंगल्यावर बोलावून उपोषण सोडविण्याची पालकमंत्री संजय शिरसाट यांची कृती वादात सापडली आहे. संदीप सेठी हे शेतकऱ्यांसाठी नऊ दिवसांपासून कन्नड येथे उपोषण करत होते. मात्र पालकमंत्र्यांना त्यांच्याकडे जायला वेळ नव्हता. त्यामुळे शिरसाट यांनी सेठी यांना रात्री उशिरा बंगल्यावर बोलावत त्यांचे उपोषण सोडविले. त्यांच्या या असंवेदनशील कृतीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.
कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी कन्नडमध्ये संदीप सेठी हे १० ऑक्टोबरपासून कन्नड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी विनंती करूनही सेठी यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
पालकमंत्री शिरसाट उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका सेठी यांनी घेतली. त्यानंतर तहसीलदारांनी मंत्री शिरसाट यांच्या पीएशी संपर्क साधला. त्यावर शिरसाट यांच्या पीएने मंत्री शिरसाट कन्नडला येऊ शकणार नाहीत, त्यांचे शेड्युल बिझी आहे, तुम्हीच त्यांना इकडे घेऊन या, इथेच उपोषण सोडवू, असा निरोप दिला. त्यानंतर तहसीलदारांनी रात्री उशिरा उपोषणकर्ते सेठी यांना रुग्णवाहिकेत टाकून छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्यावर आणले. इथे संजय शिरसाट यांनी फळांचा ज्यूस पाजून सेठी यांचे उपोषण सोडविले. मंत्री शिरसाट यांनी उपोषणकर्ता आपल्या दारी हा पॅटर्न राबविल्याने त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संजय शिरसाटांचा खुलासा
मी त्या दिवशी संध्याकाळी मुंबईहून आलो. उपो-षणकर्त्याचे वडील हे पूर्वाश्रमीचे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते. माझ्या हातूनच उपोषण सोडणार, अशी इच्छा उपो-षणकत्यनि व्यक्त केली होती. म्हणून त्यांना इथे बोलावले. त्यांचे कुटुंबीयही सोबत होते. आमच्यात सविस्तर चर्चा झाली, असा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.