Minimum temperature will drop by 2 to 3 degrees, predicts Meteorological Department
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून बदल होत असून, हा बदल आगामी आठवड्यात अधिक स्पष्टपणे जाणवणार आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या उत् रेिकडील कोरड्या आणि थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे शहरसह परिसरातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या गारव्यात वाढ होणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शहरातील किमान तापमान सध्या १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. मात्र पुढील पाच दिवसांत तापमान आणखी २ ते ३ अंशांनी खाली जाण्याची शक्यता असून, ९ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत राहाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थंड वाऱ्याचा जोर वाढत असल्याने सकाळची धुक्याची चादर अधिक दाट असू शकते.
तसेच दिवसभर हवा कोरडी राहणार असून, रात्रीच्या वेळी थंडीत भर पडणार आहे. आठवड्याभरात किमान तापमानात क्रमाक्रमाने घट होत गारव्याची तीव्रता वाढेल, असा स्पष्ट अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत शुक्रवारी (दि. १४) किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३.१ अशं सेल्सिअस नोंदवले गेले.
गारवा वाढणार
शहर परिसरात १२ ते १८ नोव्हेंबर असे पाच दिवस पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहाणार असून, कमाल आणि किमान तापमान सरासरी-पेक्षा थोडेसे कमी राहण्याची शक्यता असल्याने रात्रीची थंडी वाढणार आहे. तर पहाटेच्या सुमारास गार वारे वाहण्याचा अंदाज आहे.
पिकांसाठी ठरणार अनुकूल
वातावरणातील या बदलाचा परिणाम शेती पिकांवरही दिसू शकतो. हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला यासारख्या उभ्या पिकांना ही थंडी अनुकूल ठरणार असून, वाढ आणि उत्पादनक्षमतेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
थंडीचा जोर वाढत असल्याने हवामान विभागाने सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा यामुळे आरोग्य बिघडू नये म्हणून लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.