Sambhajinaga News : मिलकॉर्नर ते खडकेश्वर रस्ता खड्डेमय  file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinaga News : मिलकॉर्नर ते खडकेश्वर रस्ता खड्डेमय

नव्या जलवाहिनीलाही गळती, खड्डे बुडाले पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

Mill Corner to Khadkeshwar road riddled with potholes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेल्या मिलकॉर्नर-खडकेश्वर रस्त्याची कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर खोदकाम केलेला भाग व्यवस्थितपणे पूर्ववत न केल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच नव्याने टाकलेल्या जलवाहिनीलाच तीन ते चार ठिकाणी गळती लागल्याने रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे वर्दळीच्या या मार्गावरून वाहनचालकांना रोजच जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

मिलकॉर्नर ते खडकेश्वर हा शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर खड्यांची मालिकाच निर्माण झाली आहे. जलवाहिनीच्या गळतीचे पाणी रस्त्यावर पसरत असून, पाणीपुरवठ्याच्या दिवशी परिस्थिती आणखी बिकट होते. खड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि आकार वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

अचानक चाक खड्ड्यात गेल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची शक्यता आहे, तर चारचाकी वाहनांना मोठ्या सावधगिरीने मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, जोरदार पावसाने हा मुरूम वाहून गेल्याने रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. त्यावरून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तसेच कंत्राटदाराने काम पूर्ण करताना रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी गांभीर्याने घेतली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे नागरिकांचे मत आहे.

पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातच रस्त्याची दैना

विशेष म्हणजे मिलकॉर्नर-खडकेश्वर परिसर महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांच्या प्रभागात येतो. प्रमुख रस्त्याची अशी अवस्था असतानाही प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष कायम असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील रस्त्यांची ही अवस्था असेल, तर शहरातील अन्य रस्त्यांच्या देखभालीकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अपघाताचा वाढला धोका

जलवाहिनीची गळती आणि पाणीपुरवठ्याच्या दिवशी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील खड्डे अक्षरशः लपून जातात. पाण्याखालील खड्याची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे तात्पुरत्या मुरूमाच्या मलमपट्टीऐवजी कंत्राटदाराकडून रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करून घेणे आणि जलवाहिनीची गळती तातडीने बंद करणे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT