Milk Vendor Sexually Assaults Separated Woman Under the Pretext of Offering Employment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कामाची गरज असलेल्या एका २८ वर्षीय विभक्त महिलेला मेसमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर दूध विक्रेत्याने अत्याचार केला. ही संतापजनक घटना २०२४ ते २०२६ या दरम्यान महावीर चौक, उस्मानपुरा भागात घडली. पीडितेला रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळही केली.
याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.९) आरोपी विजय राऊत (रा. केतकी अपार्टमेंट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक केली असून १३ मे पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी दिली.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ती चार वर्षांपासून पतीपासून विभक्त असून तिच्या आई, भाऊ व लहान मुलीसोबत राहते. आरोपी विजय राऊत हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. जुलै २०२४ मध्ये त्याने पीडितेला आपल्या घरी असलेल्या मेसमध्ये पोळ्या आणि भांडी घासण्याचे काम दिले. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीची पत्नी बाहेरगावी गेली होती.
याचा फायदा घेत त्याने पीडितेला बेडरूम खराब झाली आहे, ती स्वच्छ करून दे असे सांगून बेडरूममध्ये नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. याबद्दल कुणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या मुलीला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार धमकावून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून पीडितेने मार्च २०२५ मध्ये काम सोडले
भर रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ
२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पीडिता उल्कानगरीकडून घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात गाठले. मला तुला भेटायचे आहे असे म्हणून तिच्याशी गैरवर्तन केले. पीडितेने विरोध करत जातीवाचक शिवीगाळ करत पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने शनिवारी (दि.९) उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर करत आहेत.