MGP's demand to the Municipal Corporation for 11 MLD
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या १९५ कोटी रुपयांच्या जुन्या पाणी योजनेचा आता शहरालगतच्या गावांसाठी वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात २८ ते २९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे ११ एमएलडी पाण्याची मागणी केली आहे. गावांमध्ये ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली असून स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाक्यांची कामेही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत.
शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जुन्या ७०० मिमी व्यासाच्या पाणी योजनेचे पुनरुज्जीवन करून ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यास मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी सुमारे १९५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेतून दररोज ७५ एमएलडी पाणी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्रही उभारण्यात आले आहे.
दरम्यान, २७४० कोटी रुपयांची नवीन पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर २०० मिमी पाइपलाइनच्या या योजनेचा वापर शहर परिसरातील गावांसाठी करण्याचे शासनाचे नियोजन आहे. यंदा दुष्काळाचे सावट असल्याने या गावांमध्ये पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पायाभूत पायाभूत सुविधांचा सुविधांचा उपयोग उ करून गावांची तहान भागविण्याची तयारी एमजीपीने सुरू केली असून गावांमध्ये टाकण्यात आलेल्या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. नियोजित १९ पाण्याच्या टाक्यांपैकी १६ टाक्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी केवळ किरकोळ जोडणीची कामे बाकी आहेत. ती पूर्ण करून पहिल्या टप्प्यातील गावांना पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे.
जोडणीची किरकोळ कामे शिल्लक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील २८ ते २९ गावांना पाणी देण्याची तयारी करण्यात आली आहे. गावांमधील पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. १९ पैकी १६ टाक्यांची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी किरकोळ जोडणीची कामे शिल्लक आहेत. ६६४ मीटर उंचीवरील संतुलित जलकुंभातून पाणी देण्यासाठी महापालिकेकडे मागणी करण्यात आली आहे.- दीपक कोळी, कार्यकारी अभियंता, एमजीपी
या गावांना मिळणार पाणी
जाटवाडा, ओहर, इस्लामपूर, अश्रफपूर, सावंगी, तुडजापूर, कृष्णपूरवाडी, पिसादेवी, गोपाळपूर, साईजतपूर, मांडकी, बकापूर, रामपूर, कच्ची घाटी, सुलतानपूर, हिरापूर, फत्तेपूर, सुंदरवाडी, झाल्टा, गांधेली, बागतलाव, बाळापूर, गेवराई तांडा, गेवराई बुद्रुक, तिसगाव, वंजारवाडी, रासपूर-रावसपुरा, अब्दीमंडी, माळीवाडा, दौलताबाद, शरणपूर, केसापुरी, केसापुरी तांडा, कान्हपूर, धर्मपूर