Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Health Department Recruitment : गुणवत्ता यादीला बगल; ८४ कंत्राटी पदांची भरती

निकषांकडे दुर्लक्ष : मनपाच्या आरोग्य विभागाकडून थेट मुलाखतींचा मार्ग

पुढारी वृत्तसेवा

Merit list bypassed; recruitment for 84 contractual posts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातील ८४ कंत्राटी पदांच्या भरती प्रक्रियेवरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटी पदांसाठी अर्ज मागवून निर्धारित निकषांनुसार गुणांकन करत गुणवत्ता यादी तयार करून निवड करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने थेट मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून एमपीडब्ल्यू २८ पदासाठी बुधवारी (दि.३०) मुलाखती घेण्यात आल्या. यात शासनाच्या भरती प्रक्रियेला बगल देऊन मुलाखतींच्या माध्यमातून निवड करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागातील कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे तत्कालीन आयुक्त धीरजकुमार यांनी २७ एप्रिल २०२३ रोजी सहा पानी निकष निश्चित केले होते. हे निकष राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांना लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि अन्य निर्धारित निकषांच्या आधारे गुणांकन करून गुणवत्ता यादी तयार करणे अपेक्षित आहे.

यापूर्वीच्या कंत्राटी भरतीमध्येही महापालिकेने गुणवत्ता यादीचा आधार घेतला आहे. मात्र, यावेळी आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या या निर्देशांचा आधार न घेता मुलाखतींच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मंगळवारी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. स्टाफ नर्सच्या २२ पदांसाठी तब्बल ३९० अर्ज आले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३४ पदांसाठी २३४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर २८ एमपीडब्ल्यू पदांसाठी सर्वाधिक ४०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारे ८४ पदांसाठी एकूण १ हजार २७अर्ज आले असून एमपीडब्ल्यू पदासाठी बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे. भरती प्रक्रिया शासनाच्या निर्धारित पद्धतीनुसार होत आहे की नाही, यासोबतच आचारसंहितेच्या काळात ही प्रक्रिया राबविण्याची वैधता काय, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

१०० गुणांचे मूल्यांकनानंतर गुणवत्ता यादी

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार कंत्राटी पदांच्या भरतीत उमेदवारांचे १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शेवटच्या परीक्षेतील गुणांसाठी ५० गुण, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेसाठी २० गुण आणि अनुभवासाठी ३० गुण अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. या गुणांकनाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्यातून पात्र उमेदवारांची निवड करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

आचारसंहितेचा फारसा फरक पडणार नाही आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा फारसा फरक पडणार नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उमेदवारांना मुलाखतीची तारीख देण्यात आली होती. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करून विभागीय आयुक्त तसेच निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागविले जाईल.
अमोल येडगे, मनपा आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT