MD Drugs Business : फार्मा कंपन्यांमधील कचऱ्यातील पावडरपासून एमडी ड्रग्सचा धंदा File Photo
छत्रपती संभाजीनगर

MD Drugs Business : फार्मा कंपन्यांमधील कचऱ्यातील पावडरपासून एमडी ड्रग्सचा धंदा

साजापुरात भंगार व्यावसायिकांसह तिघांना एनडीपीएसच्या पथकाने ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

MD drugs business from powder in waste from pharma companies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा फार्मा कंपन्यांमधून कचऱ्यात निघणाऱ्या गोळ्यांच्या पावडरपासून एमडी ड्रग्सचा धंदा करणाऱ्या भंगार व्यावसायिकांसह तिघांना एनडीपीएसच्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. ही कारवाई २१ ते २३ जूनदरम्यान साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात करण्यात आली.

भंगार व्यावसायिक बबन खान (रा. साजापूर), सफिकूर रहेमान तफज्जूल हुसेन (४५) आणि राज रामतीरथ अजुरे (दोघेही ३८, रा. उत्तरप्रदेश, ह. मु. बबन खानचे गोदाम, साजापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी मंगळवारी (दि. २४) दिली.

अधिक माहितीनुसार, शहरातील नशेखोरांवर कडक कारवाईसाठी पदभार घेताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या अधिपत्याखाली अँटी नार्कोटिक्सचे पथक स्थापन केले होते. या पथकाने आजवर अनेक कारवाया केल्या आहेत.

शनिवारी साजापूर गाव ते चौफुली दरम्यान वाहनांमधील स्क्रॅपमधून ड्रग्स पावडर वाहतूक केली जात असल्याची माहिती बागवडे यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून दोन टेम्पोसह हुसेन आणि अजुरेला पकडले. तपासणीत रसायन व द्रव पदार्थ मिळून आले होते. त्यानंतर सोमवारी पथकाने बबन खानच्या गोदामात छापा मारला.

स्क्रॅपमध्ये एमडी पावडर मिळून आली. त्याच्या तपासणीत ती एमडी ड्रग्स अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. २ किलो ४७३ ग्राम एमडी पावडर, दोन आयशर टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, जमादार लालाखान पठाण, अंमलदार संदीपान धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे, शिल्पा तेलोरे यांच्या पथकाने केली.

कचरा बाहेर देणाऱ्या कंपन्या रडारवर

एमआयडीसी वाळूज भागात अनेक नामांकित फार्मा कंपन्या आहेत. काही कंपन्यांतील कॅन्सरसह अन्य गंभीर आजारांवरील गोळ्या तयार करताना खाली सांडलेली पावडर कचऱ्यात टाकली जाते. मात्र हाच कचरा बबन खान याच्या गोदामात आणला जातो. कंपन्यांमधून मेडिकल वेस्ट बाहेर देण्यास परवानगी नसताना खानच्या गोदामात सर्रासपणे फार्मा कंपन्यांतील कचऱ्याच्या पिशव्या येत असल्याचे समोर आले आहे. हा कचरा कोणामार्फत दिला जातो, कोणत्या कंपन्यांमधून येतो याचा पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT