

छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे सव्वा कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाई याला पोलीस ठाण्यातच व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीला कुटुंबासोबत जेवणाची सोय करून देत, त्याची बडदास्त ठेवली जात असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत साजापूर येथून सव्वा कोटींपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. याप्रकरणी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या बबनभाईला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याला दिली जाणारी वागणूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, २४ जूनच्या रात्री वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हॉलमध्ये आरोपी बबनभाई टेबलावर बसलेला दिसत आहे. त्याच्यासाठी खास पंख्याची सोय करण्यात आली असून, तो आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेत आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर मानसिक दबाव ठेवण्याऐवजी त्याला अशा प्रकारे आरामदायक वागणूक दिली जात असल्याने पोलिसांच्या निष्पक्षतेवर आणि तपासाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अशाप्रकारे पाहुणचार मिळत असल्याने या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हायरल फोटोमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.