

Six companies invest Rs 1200 crore in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: संभाजीनगरातील औद्योगिक वसाहतीत एक नाही दोन नाही तर तब्बल सहा कंपन्यांनी गुंतवणूक जाहीर केली आहे. यात जपानच्या टोयोडा-गोसाई आणि एनएक्स लॉजिस्टीक यांचाही समावेश असून, बिडकीन डीएमआयडीसी येथील ६१ एकर जागेत सुमारे बाराशे कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून सुमारे ३५०० थेट रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
आगामी काळात छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीत टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, अथर सह इतर काही मोठ्या कंपन्यांचे प्रत्यक्ष ईव्ही वाहनांचे उत्पादन सुरु होणार आहे. यासाठी गुंतवणूक जाहीर केली असून, त्या कंपन्यांना जमिनीही मिळाली आहे. यामुळे या मोठ्या कंपन्यांच्या वेंडर कंपन्यांकडूनही संभाजीनगरात गुंतवणुकीसाठी चढाओढ सुरू आहे.
यापैकी सहा कंपन्यांना ऑरिककडून मंगळवारी भूखंड देकार प्रस्ताव देण्यात आले. यात जपानच्या टोयोटाचाच एक भाग असलेली टोयोडा-गोसाई कंपनी, जपानच्या निप्पॉन एक्सप्रेस कंपनीची एनएक्स लॉजिस्टीक यांच्यासह मेटलमैन ग्रुप, महेंद्रा अॅसलो, राको स्टिम बॉइलर, जुन्ना सोलार यांचा समावेश आहे. यासर्व सहा कंपन्यांना बिडकीन येथे ६१ एकर जागा देण्यात आली असून, तिथे एकूण १ हजार १८९ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईव्ही मेगा प्रोजक्टच्या गुंतवणुकीमुळे संभाजीनगर शहराची इलेक्ट्रिक मोबिलिटी हबकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांसह त्यांच्या वेंडर कंपन्याही येथील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत.
संभाजीनगरातील औद्योगिक वसाहतीत अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक वेंडर कंपन्यांनाही गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. अशाच सहा कंपन्यांना भूखंड देकार प्रस्ताव देण्यात आला. बिडकीन येथील ६१ एकर जागेत १,१७९ कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती डीएमआयसीचे व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली.