MCOCA on Kaleem Qureshi gang
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रेशन दुकानांवर आलेल्या अंगणवाडी बालके तसेच गरोदर मातांच्या पोषण आहाराची बेकायदा साठवणूक करून ती परराज्यात काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या कलीम छोटू कुरेशी व त्याच्या पाच साथीदारांवर मोक्का लावण्यात आला आहे. कुरेशी याच्या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
१२ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेने किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनी येथील एम.आर. फंक्शन हॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यावर छापा टाकला होता. या कारवाईत शासनामार्फत मिळणारा गहू, तांदूळ, मका, ज्वारी, साखरेसह महिला व बालविकास विभागाचा पोषण आहार असा १७लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. संघटित टोळी बनवून हा गुन्हा केल्याने पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी आणि शेख अजहर हे फरार असून, समीर कुरेशी, फहाद शुत्तारी, फरदीन पठाण आणि आवेज कुरेशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख करत आहेत. शहर व ग्रामीण भागातून गोळा केलेला रेशनचा तांदूळ
वाळूजमधील एका राइस प्रोसेसिंग युनिटमध्ये पाठवला जात होता. तो तांदूळ रेशनचा भासू नये म्हणून नव्या आकर्षक पॅकिंगमध्ये भरून गुजरातच्या बाजारात विक्रीसाठी पाठवल जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील बालकांच्या हक्काचा तांदूळ परराज्यात जात असल्याने आयुक्तांनी कठोर भूमिका घेत मोक्काची कारवाई केली आहे.
कलीम कुरेशी फरार
कलीम कुरेशी व त्याच्या पाच साथीदारांना मोक्का लावण्यात आल्याची कुणकुण लागताच काळा बाजार करणाऱ्या टोळीचा सूत्रधार कुरेशी व शेख अजहर हे दोघे फारार झाले आहेत. त्या दोघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या कारवाईमुळे रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.