Mayor warns of action against unauthorized hoardings
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचा इशारा देणाऱ्या महापौर समीर राजूरकर यांच्या आवाहनाला शहरात सुरू असलेल्या महानाट्याच्या आयोजकांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सिडको उड्डाणपुलावर महानाट्याचे बॅनर कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्यानंतर जालना रोडवरील बॅनर्स हटविण्यात आले. मात्र, संग्रामनगर उड्डाणपुलासह बीड बायपास आणि शहरातील अन्य भागांत अद्यापही पोस्टर्स झळकत आहेत. त्यामुळे एका दुर्घटनेनंतरही धोकादायक जाहिरात फलकांचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.
शहरात एका पक्षाच्या कार्यकर्त्याकडून २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स शहरातील विविध चौक, उड्डाणपूल आणि प्रमुख रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. मात्र, तीन दिवसांपूर्वी सिडको उड्डाणपुलावर लावलेले या महानाट्याचे एक पोस्टर्स अचानक दुचाकीस्वाराच्या वाहनासमोर कोसळले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वार जखमी झाला. या घटनेने शहरातील जाहिरात फलकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर जालना रोडवरील काही पोस्टर्स काढण्यात आले. मात्र, संग्रामनगर उड्डाणपूल, बीड बायपास आणि इतर परिसरातील बॅनर्स व पोस्टर्स कायम असल्याने कारवाई निवडक ठिकाणांपुरतीच मर्यादित होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर महापौर समीर राजूरकर यांनी गुरुवारी (दि. २९) अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्स स्वतःहून हटवावेत, चौका चौकांमध्ये आणि पथदिव्यांवर धोकादायक पद्धतीने जाहिरात फलक लावू नयेत, असे स्पष्ट शब्दांत आवाहन केले. तसेच महापालिकेला कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात मोहीम राबविल्याचे सांगत महापौरांनी आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील महापालिकांकडून अनुकरण
फेब्रुवारी महिन्यात शहरात होर्डिंग हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या उपक्रमानंतर राज्यातील अन्य महापालिकांनीही आपापल्या शहरांत होर्डिंगमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले. आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर झळकणाऱ्या होर्डिंगपैकी किती होर्डिंगना महापालिकेची अधिकृत परवानगी आहे, याचीही तपासणी केली जाणार असल्याचे महापौर राजूरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगबरोबरच परवानगीच्या आधारे उभारलेल्या जाहिरात फलकांची वैधताही तपासली जाणार आहे.
दुर्घटनेनंतरही सुरक्षिततेचा प्रश्न कायम
शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक अनधिकृत होर्डिंग असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा फलकांमुळे शहराच्या विद्रुपीकरणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. सिडको उड्डाणपुलावरील दुर्घटनेनंतरही अन्य ठिकाणचे पोस्टर्स, बॅनर्स कायम असल्याने संबंधित आयोजक कार्यकत्यान स्वतःहून ते हटविण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि उर्वरित पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यासाठी कोणती कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.