Maternity department gears up to prevent maternal deaths
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीपश्चात अतिरक्तस्रावामुळे होणारे मातामृत्यू रोखण्यासाठी घाटीतील स्त्रीरोग व प्रसूती विभाग पुढाकार घेतला आहे. यासाठी आज सोमवारी (दि.५) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, यात मातामृत्यू शून्यावर आणण्यासाठी वेळेत निदान, प्रतिबंध, उपचार आणि व्यवस्थापन याबाबत आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ५ ऑक्टोबर हा जागतिक पीपीएच दिन म्हणून निश्चित केला असून, यंदा पहिला जागतिक पीपीएच दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोमवारी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते होणार आहे.
विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे यांच्या वतीने ही कार्यशाळा परिचारिका, आरोग्य अधिकारी तसेच प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी आयोजित केली आहे. कार्यक्रमादरम्यान पीपीएच मुळे होणारे मातामृत्यू रोखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, उपचारपद्धती आणि प्रभावी उपाययोजनांचा झिरो डेथ फ्रॉम पीपीएच या हँडबुकचेही विमोजन करण्यात येणान आहे.
दर १२ मिनिटांनी एका मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे दर १२ मिनिटांनी एका महिलेचा मातामृत्यू होतो, तर दरवर्षी सुमारे ४५ हजार मातांचा मृत्यू होतो. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेळेत निदान, प्रतिबंध, योग्य उपचार आणि प्रभावी व्यवस्थापन याबाबत जनजागृती व वैद्यकीय प्रशिक्षण देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग.