Marathwada's industrial prosperity through the MASSIA Expo: Minister Jadhav
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
उद्योग क्षेत्रातील सर्वच भागिदारांना मसिआ एक्सपोने एकाच छताखाली आणले. यातून आधुनिक तंत्रज्ञान, माहितीचे आदान-प्रदान झाले. हे मराठवाड्याच्या भविष्यासाठी खूप गरजेचे होते, असे गौरवोद्वार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रविवारी (दि.११) मसिआ एक्सपोच्या समारोपप्रसंगी काढले. एक्सपोच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मसिआच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले.
मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला नवी चालना देणाऱ्या मसिआ संघटनेकडून ऑरिक शेंद्रा येथे अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ हे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांचा भरघोष प्रतिसाद मिळाला. एक्सपोच्या चार दिवसांत देश-विदेशांतील तब्बल तीन लाख १५ हजारांहून अधिक विजिटर्सनी भेटी दिल्या.
शेवटच्या दिवशी रविवारी उद्योग प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. सांयकाळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांच्या उपस्थित एक्सपोचा समारोप करण्यात आला. तत्पूर्वी यावेळी मसिआ अध्यक्ष अर्जुन गायकवाड संयोजक अनिल पाटील, चेतन राऊत, उपाध्यक्ष राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिव सचिन गायके, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.
मसिआ टीमचे अभिनंदन
एक्पसोच्या ठिकाणी रविवारी सकाळी एमआयडीसीचे सीईओ पी. वेलारसू, विजय राठोड, झांजे यांच्यासह कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी यांनी पूर्ण प्रदर्शन पाहणी करत स्टॉल होल्डर्स व मसिआ टीमचे अभिनंदन केले.
प्रदर्शनात टोयोटा, अथरसह अनेक कंपन्यांचा सहभाग
या प्रदर्शनात विविध उत्पादनांचे देशभरातून व काही जगभरातील टाटा, जेएसडब्ल्यू, टोयोटा, अथर, ब्ल्यू स्टारसह विविध नामांकित मशीनरी निमति यांचे मशीन टूल्स, ऑटो कॉम्पोनन्ट्स, ऑटोमेशन, गेजेस, फिक्सचर्स, डाय अँड मोल्ड, मेटल सर्फेस फिनिशर इंडस्ट्रीज, अॅग्रिकल्चर, फूड इंडस्ट्रीज, फायनान्स इंडस्ट्रीजसह विविध स्टॉलला भेट देत विजिटर्सनी माहिती घेतली.
सीएसएन पव्हेलियन विशेष आकर्षण
या प्रदर्शनात नागपूर, मुंबई, पुणे, नगर, जळगाव, नाशिक, बारामती, सोलापूर तसेच परराज्यातील विविध शहरातील उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी यांनी भेट देऊन कौतुक केले. या प्रदर्शनात सीएसएन पव्हेलियनमध्ये छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील विविध भागांतील उत्पादकांचे प्रोडक्टस सर्वांचाचे विशेष आकर्षण ठरले. या ठिकाणी दिवसभर सर्वाधिक गर्दी होती.